पुढारी ऑनलाईन: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शुक्रवार (दि.०८) आणि शनिवारी (दि.०९) रात्रीपासून संशयास्पद हालचाली दिसत होत्या. दरम्यान भारतीय लष्कराने सीमेवर गोळीबार करत जोरदार पलटवार केला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून घुसखोरी करणाऱ्या एका घुसखोराला ठार करण्यात भारतीय लष्काराला यश आले आहे. तर आणखी दोघांचा अद्याप शोध सुरू आहे, अशी माहिती पीटीआयने दिलेल्या वृत्तात दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतामध्ये घुसण्याचा काही अज्ञातांनी प्रयत्न केला. दरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांनी रविवारी (दि.०९) दहशतवाद्यांच्या एका गटाला जोरदार प्रतिउत्तर देत, गोळीबार केला, असे वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले. दरम्यान शाहपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नियंत्रण रेषेचे रक्षण करणार्या लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या असून, त्यांना भारतीय लष्कराकडून जोरदार आव्हान दिले जात आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला जो बराच वेळ सुरू होता. यामध्ये एक घुसखोर मारला गेला असून, अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.