जळगाव : पुढारी वृत्तसेवा- शेतातून बैलगाडीने चारा घेवून येत असतांना बांधावर अचानक बैलगाडी पलटी झाल्याने 13 वर्षीय मुलगा जागीच ठार झाला आहे. बैलगाडीच्या लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने या घटनेत सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज (दि. ११) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव आंनदा पाटील वय १३ रा. वाकडी ता. जळगाव हा आपल्या आईवडील, भाऊ आणि बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो म्हसावद गावातील थेपडे गावातील शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी (दि. ११ ) रोजी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला. शेतात चारा घेवून येत असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैलगाडीने शेतातच्या बांधावरून येत होता. त्यावेळी अचानक बैलगाडी उलटी झाली. यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला. घटनेत गौरव पाटील हा जागीच ठार झाला. शेतातजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
हेही वाचा :