Latest

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणातील चार नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र

गणेश सोनवणे

जळगाव,  तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यातील गुन्हा सिद्ध झालेल्या चार नगरसेवकांना निवडणूक लढवण्यासाठी सहा वर्षांसाठी महापालिका सदस्य होण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी आज आदेश जाहीर केला.

तत्कालीन नगरपालिकेमध्ये घरकुल घोटाळा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात गाजला होता. यात माजी आमदार, नगराध्यक्षांसह ४३ आजी-माजी नगरसेवकांना धुळे विशेष सत्र न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१९ रोजी दोषी ठरवले होते. तर याच प्रकरणात सुरेशदादा जैन आणि इतरांना कारागृहात जावे लागले होते. घरकुल घोटाळा प्रकरणातील शिक्षा सुनावण्या आधीच अपात्र ठरविण्यात आलेले भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे हे २०१८ च्या निवडणुकीत भाजप कडून विजयी झालेले होते तर कैलास सोनवणे यांना स्वीकृत नगरसेवक पदी घेण्यात आले होते.

घरकुल घोटाळ्यात न्यायाल्याने शिक्षा ठोठावल्याने चारही नगरसेवकांना अपात्र करावे यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यात न्यायालयाने या चौघांना अपात्र करण्याचे निर्देश दिले होते. या निकालानंतर संबंधितांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशीव ढेकळे आणि लताताई भोईटे या चौघांना सहा वर्षांसाठी अपात्र केले आहे.

या प्रकरणात चार माजी नगरसेवकांना आयुक्त विद्या गायकवाड यांनी २०१९ या कालावधीपासून त्यांना अपात्र ठरविले आहे. याबाबतचे आदेश २०२३ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी जाहीर केलेले आहेत.

या चार नगरसेवकांमध्ये कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, भगत बालानी आणि लताताई भोईटे यांचा समावेश आहे. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे चारही माजी नगरसेवक सहा वर्षानंतर निवडणूक लढवण्यास अपात्र ठरले असले तरी त्यांना २०२५ मध्ये निवडणूक लढवता येणार आहे. सध्याला राज्य सरकारने महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलले आहेत. २०२४ मध्ये एप्रिल-मे महिन्यात लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल कधी वाजणार त्यावर या चारही माजी नगरसेवकांचे भविष्य अवलंबून आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT