Latest

IPL 2024 : गुजरातसाठी गिलचे नेतृत्व ‘शुभ’ ठरेल?

Shambhuraj Pachindre

गेल्या मोसमातील उपविजेत्या गुजरात टायटन्ससमोर यंदाच्या मोसमात अनेक आव्हाने आहेत. गतवर्षी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने साखळी फेरीत पहिले स्थान मिळवून स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली होती, पण विजेतेपदाच्या त्या लढतीत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला. (IPL 2024)

आयपीएल 2023 मध्ये गुजरातने 10 सामने जिंकले होते, तर 4 सामने गमावले होते. संघाने सलग दुसर्‍या वर्षी अंतिम फेरी गाठली. पण, यंदाच्या हंगामात परिस्थिती वेगळी आहे. गेल्या दोन हंगामांत संघाला अंतिम फेरीत नेणारा पंड्या यावेळी संघासोबत नाही. तो आता मुंबई इंडियन्समध्ये गेला असून त्या संघाचा कर्णधार बनला आहे. त्याच्या जाण्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती केली. आता या युवा खेळाडूच्या नेतृत्वाखाली जीटी संघ यशस्वी वाटचाल कायम राखण्यात यशस्वी होता का? याकडे चाहत्यांची नजर लागली आहे.

शमीच्या दुखापतीचा फटका बसणार?

मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. ज्यामुळे गुजरात टायटन्सची गोलंदाजी कमकुवत झाल्याची चिन्हे आहेत. शमीने आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक 28 विकेटस् घेतल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये त्याने सर्वाधिक 17 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. विकेटकीपर मॅथ्यू वेडलाही शेफिल्ड शिल्डच्या अंतिम फेरीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे. टायटन्सने 3.60 कोटी रुपयांना विकत घेतलेला अनकॅप्ड यष्टिरक्षक रॉबिन मिन्झ रस्ते अपघातात जखमी झाला आहे. 3.6 कोटी रुपयांना विकत घेतलेला हा युवा खेळाडू खेळेल की नाही याबाबत शंका आहे. (IPL 2024)

राशिद खान फिट

राशिद खान दुखापतीतून सावरला आहे. तो जीटीसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. त्याने आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत आठ विकेटस्ही घेत चमकदार कामगिरी केली. त्याने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये 143 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने 15 विकेटस्सह 352 धावा फटकावल्या.

पॉवर प्लेतील गोलंदाजी कमकुवत

पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी जीटीसाठी एक समस्या बनू शकते. उमेश यादवने गेल्या मोसमात 8.78 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. या बाबतीत फक्त पाच गोलंदाज त्याच्यापेक्षा महागडे ठरले होते. मोहित शर्मा मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करतो, तर कार्तिक त्यागी आणि दर्शन नळकांडे यांची टी-20 तील इकॉनॉमी अनुक्रमे 9.19 आणि 8.08 आहे.

गिलकडे प्रथमच नेतृत्व

हार्दिक पंड्या मुंबईत दाखल झाल्यामुळे जीटीकडे शुभमन गिल हा नवा कर्णधार आहे. गेल्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याला कर्णधारपदाचा अनुभव फारच कमी आहे. गिलने याआधी 2019-20 मध्ये पंजाबच्या राज्य संघासाठी दोन टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यावेळी लिलावात जीटीने अफगाणिस्तानचा अष्टपैलू अजमतुल्ला ओमरझाई आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन यांना विकत घेतले होते. त्याचवेळी केन विल्यम्सननेही दुखापतीनंतर पुनरागमन केले असून तोही जीटीच्या टॉप ऑर्डरला स्थिरता देऊ शकतो.

गुजरात टायटन्सचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकिपर), मॅथ्यू वेड (विकेटकिपर), रॉबिन मिन्झे, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरूख खान, केन विल्यम्सन, अजमतुल्ला ओमरझाई, राशिद खान, मानव सुथार, अभिनव मनोहर, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, जोश लिटल, नूर अहमद, मोहित शर्मा, उमेश यादव, कार्तिक त्यागी, दर्शन नळकांडे, आर साई किशोर, जयंत यादव, सुशांत मिश्रा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT