आंतरराष्ट्रीय

देश सोडून गोटाबाया फरार; उद्या परतणार ; इतर मंत्रीही देणार राजीनामा

Shambhuraj Pachindre

कोलंबो : वृत्तसंस्था श्रीलंकेत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटात आता राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून फरार झाल्याचे समोर आले आहे. ते एखाद्या शेजारील देशात असल्याचे सांगितले जात आहे. ते बुधवारी श्रीलंकेत परतणार असल्याचे समजते.

दरम्यान, गोटाबाया यांनी अधिकृतरीत्या राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना माहिती दिली आहे. राष्ट्रपती घोषणेनुसार राजीनामा देतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. श्रीलंकेतील मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी नोकरी सोडण्याच्या अटकळी फेटाळल्या आहेत. तथापि, राजकीय अस्थिरता असेल तर दिलासा पॅकेज देण्यास विलंब होऊ शकतो, असे ते म्हणतात. राष्ट्रपती भवनातील पहिल्या मजल्यावर लाकडी कपाटासमोर गुप्‍त बंकरचा व्हिडीओ समोर आला होता. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे याच मार्गाद्वारे फरार झाल्याची चर्चा आहे.

नव्य सरकारसाठी विरोधकांची बैठक

श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार बनल्यानंतर आता विक्रमसिंघे सरकारमधील मंत्रीही राजीनामा देणार आहेत. नवीन सरकार स्थापनेसाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विरोधक यात यशस्वी झाले तर दोन महिन्यात तिसरे सरकार श्रीलंकेत स्थानापन्‍न होईल.

लोंढे वाढण्याचा स्वामी यांचा इशारा

श्रीलंकेतील लोकांचे भारतातील लोंढे वाढत जातील, असा इशारा भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. स्वामी म्हणाले, श्रीलंकेतील नेत्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. तेथील लोक सोशल मीडियावर द्वेषपूर्वक वक्‍तव्ये करीत असून आक्रमक जमाव अश्‍लील व असभ्य भाषा वापरत आहे. सुसंस्कृत श्रीलंकेने या झुंडशाहीला विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवावी. श्रीलंकन निर्वासितांचे लोंढे वाढण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत केंद्र सरकारला दक्ष रहावे लागेल, जर राजपक्षे यांना भारतीय सैन्याची मदत हवी असेल तर ती भारताने द्यावयास हवी. अवैध स्थलांतर रोखण्यासाठी तटरक्षक दलाने सागरी सीमेवर विशेष दक्षता घेतलेली आहे. याद‍ृष्टीने रामेश्‍वरमजवळील मंडपम तळावर हॉवरक्राफ्ट तैनात आहे.

…राष्ट्रपती भवन सोडणार नाही : आंदोलक

जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलक राष्ट्रपती भवनातच ठाण मांडून राहणार आहेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. राष्ट्रपती भवनात आंदोलकांनी मौजमजा केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात स्वच्छता केली. आम्हीच हा कचरा केला होता, तो आम्ही साफ केला. हे एक सार्वजनिक ठिकाण आहे, व्यवस्था बदलण्यासाठी आमचा संघर्ष आहे, असे आंदोलकांनी स्पष्ट केले.

जयसूर्याने मानले भारताचे आभार

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने भारताने श्रीलंकेला केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत. जयसूर्या म्हणाला की, आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी मी सुरवातीपासूनच आंदोलकांसोबत होतो. इतर राजकीय नेत्यांनी लवकर निर्णय घ्यावा. एकदा स्थिर सरकार बनले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, भारत आणि इतर देश मदत करतील. भारताने या संकटात श्रीलंकेची सुरवातीपासूनच मदत केली आहे. आम्ही त्यासाठी आभारी आहोत. भारत श्रीलंकेसाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT