आंतरराष्ट्रीय

Controversy : ‘वर्क फ्रॉम होम’वर ‘कॅमे-याने’ डिजिटल पहारा! अब्जाधीश मालकाच्या जाचक अटीविरोधात २३ कर्मचाऱ्यांचे राजीनामे

अब्जाधीश वकील जॉन मॉर्गन यांनी स्वतःच एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान केला खुलासा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : घरातून काम करणाऱ्या (वर्क फ्रॉम होम) कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि हालचालींवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी लॅपटॉपवर थेट कॅमेरे बसवण्याचा निर्णय एका अमेरिकी उद्योगपतीला चांगलाच भोवला आहे. उत्पादकतेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेवर घाला घालणाऱ्या या धोरणाला तीव्र विरोध करत तब्बल २३ कर्मचाऱ्यांनी एकाच आठवड्यात नोकरी सोडली. अमेरिकेतील आघाडीची कायदेविषयक सल्लागार संस्था 'मॉर्गन अँड मॉर्गन'चे संस्थापक आणि अब्जाधीश वकील जॉन मॉर्गन यांनी स्वतःच एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान या घडामोडींचा खुलासा केला असून, त्यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातील उद्योग क्षेत्रात कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि कार्यसंस्कृतीवरून नवा वाद पेटला आहे.

'द आईस्ड कॉफी अवर' या लोकप्रिय पॉडकास्टमध्ये बोलताना ७० वर्षीय जॉन मॉर्गन यांनी आजच्या पिढीच्या कामाच्या पद्धतीवर सडकून टीका केली. कोरोना महामारीनंतर बहुतांश कर्मचाऱ्यांनी पुन्हा कार्यालयात परतण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देतानाच कंपनीने त्यांच्या लॅपटॉपवर नजर ठेवणारे कॅमेरे बसवण्याचा निर्णय लागू केला. "तुम्ही घरातून काम करू शकता, मात्र तुमच्या संगणकावर आमची थेट नजर राहील. आम्ही तुमचा थेट चेहरा पाहणार नाही, केवळ डिजिटल पिक्सेलवर लक्ष ठेवू," अशी तंबी कर्मचाऱ्यांना दिल्याचे मॉर्गन यांनी सांगितले. मात्र, कंपनीचे हे जाचक पाळत धोरण जाहीर होताच पहिल्याच आठवड्यात २३ कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले.

या घटनेचा दाखला देत मॉर्गन यांनी कर्मचाऱ्यांच्या वृत्तीवर वादग्रस्त टिप्पणी केली. "आजकाल लोकांना कष्ट करण्याची तयारी राहिलेली नाही. त्यांना घरातून काम करण्याचे स्वातंत्र्य हवे असते, कारण त्यांना उत्तरदायित्व आणि वरिष्ठांचे नियंत्रण टाळायचे असते. प्रत्यक्षात त्यांना घरातून काम करायचे नाही, तर कामच करायचे नाही," असा गंभीर आरोप मॉर्गन यांनी केला. कर्मचाऱ्यांना कामाची लवचिकता नको, तर जबाबदारी टाळायची आहे, असा निष्कर्षही त्यांनी काढला.

कोण आहेत जॉन मॉर्गन?

३१ मार्च १९५६ रोजी केंटकी येथे जन्मलेले जॉन मॉर्गन हे अमेरिकेतील अत्यंत प्रभावशाली कायदेतज्ज्ञ आहेत. १९८८ मध्ये त्यांनी 'मॉर्गन अँड मॉर्गन' या अमेरिकेतील सर्वात मोठ्या पर्सनल इंज्युरी लॉ फर्मची स्थापना केली. 'फोर्ब्स'च्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत २,६५६ व्या स्थानी असलेल्या मॉर्गन यांची एकूण संपत्ती सुमारे १.५ अब्ज डॉलर्स (अंदाजे १२ हजार कोटी रुपये) इतकी आहे. त्यांची कंपनी डेटोना बीच रोलरकोस्टर दुर्घटना, टॅम्पा वॉलग्रीन्स लैंगिक छळ प्रकरण, आर. जे. रेनॉल्ड्स तंबाखू कंपनीविरोधातील खटला आणि एक्झॅक्टिस डेटा उल्लंघन यांसारख्या अनेक हाय-प्रोफाइल कायदेशीर प्रकरणांसाठी प्रसिद्ध आहे. राजकीय क्षेत्रातही मॉर्गन यांचा दबदबा असून त्यांनी यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे राज्य वित्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, तसेच अलीकडेच त्यांनी 'कॉमन ग्राउंड पार्टी' या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

सोशल मीडियावर तीव्र पडसाद

मॉर्गन यांच्या विधानानंतर समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्कर्षावरून कामाचे मूल्यमापन करण्याऐवजी त्यांच्यावर कॅमेऱ्याने पाळत ठेवणे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा भंग असल्याची भावना व्यक्त होत आहे. "घराच्या खाजगी जागेत कुणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवणे अस्वीकार्य आहे. कामाचा दर्जा निकालांवरून ठरवला पाहिजे, कीबोर्डच्या हालचालींवरून किंवा कॅमेऱ्यावरून नव्हे," अशा प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांच्या बाजूने उमटत आहेत. एका अब्जाधीशाची ही मानसिकता आजच्या वास्तववादी कार्यसंस्कृतीपासून किती तुटलेली आहे, असा सवालही संतप्त नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT