पुढारी ऑनलाईन डेस्क: एखादी सेवा-सुविधा देण्याच्या बदल्यात कर भरणे हे माणसांसाठी ठीक आहे. पण प्राणी-पक्षी कुठून कर भरणार? तरीही आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे पेंग्विन, सील या प्राण्यांना कर भरावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ट्रम्प प्रशासनाने जगभरातील देशांवर टॅरिफ लागू करताना एका निर्जन बेटावरही 10 टक्के टॅरिफ लावले आहे. या बेटावर केवळ पेंग्विन आणि सील यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना या जीवांकडूनही टॅरिफ वसूल करायचे आहे की काय? असा मजेशीर सवाल निर्माण झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये "लिबरेशन डे टॅरिफ" निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे जगभरातील देश त्यावर कठोर उपाययोजना करण्यासाठी तयारी करत असतानाच आता ट्रम्प प्रशासनाने एका निर्जन बेटावरही टॅरिफ लावल्याचे समोर आले आहे.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात एक पोस्टर दाखवून या नव्या टॅरिफमुळे प्रभावित देश व प्रदेश यांची यादीच सादर केली. तसेच पत्रकारांना माहितीपत्रकेही दिली.
अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सर्व देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी किमान 10 ते कमाल 50 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. यात ट्रम्प प्रशासनाने सब-अंटार्क्टिक हिंदी महासागरातील हर्ड आणि मॅकडोनाल्ड या निर्जन बेटांचाही समावेश केला आहे.
विशेष म्हणजे, या बेटांवर कुणीही राहत नाही. तथापि, ही बेटे ऑस्ट्रेलियन प्रदेशाचा भाग असल्याने त्यांचा समावेश करण्यात आला आहे, असे एका व्हाईट हाऊस अधिकाऱ्याच्या हवाल्याने Axios या वेबसाईटने याबाबतच्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटे जगातील निर्मनुष्य आणि दुर्गम ठिकाणांपैकी एक आहेत. ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रोग्रॅमच्या माहितीनुसार, हर्ड बेटावर पोहोचण्यासाठी पर्थजवळील फ्रेमंटल बंदरातून जहाजाने पोहचायला हवामान कसे असेल त्यानुसार अंदाजे 10 दिवस लागतात.
ही बेटे पेंग्विन, सील आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या वसाहतींसाठी ओळखली जातात. त्यापैकी काही प्रजाती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संवर्धन यादीत समाविष्ट आहेत.
या बेटांवर 10 वर्षात कुणीही गेलेले नाही....
हे दूरस्थ ठिकाण UNESCO वर्ल्ड हेरिटेजच्याही यादीत आहे. हे ऑस्ट्रेलियन क्षेत्र ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ यादीत होते, ज्यामुळे मुख्य ऑस्ट्रेलियासह या भागावर किमान 10 टक्के टॅरिफ लागू करण्यात आले. ही बेटे निर्जन आहेत आणि तिथे गेल्या 10 वर्षांत कोणीही गेलेले नाही, असे The Guardian ने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी, पृथ्वीवरील कोणतेही ठिकाण सुरक्षित नाही, असे म्हटले आहे. त्यांनी X वर पोस्टमध्ये लिहिले आहे की, "ही अनिश्चिततेची वेळ आहे - पण सर्व ऑस्ट्रेलियन याबाबत निश्चिंत राहू शकतात.
हे टॅरिफ अनपेक्षित नाहीत, पण त्यांची आवश्यकता नव्हती. अनेक देशांवर या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक परिणाम होईल. ऑस्ट्रेलिया या परिणामांसाठी सर्वांधिक तयारी केली आहे. "
ऑस्ट्रेलियाच्या इतरही बेटांवर टॅरिफ
हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या इतर काही बाह्य प्रदेशांवर देखील टॅरिफ लावण्यात आले आहे. यामध्ये कोकोस (कीलिंग) बेटे, ख्रिसमस बेट आणि नॉरफोक बेट यांचा समावेश आहे.
नॉरफोक बेटावर 2188 लोक राहतात. तिथे 29 टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे जे ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित भागापेक्षा 19 टक्के अधिक आहे.