Satyajit Ray house Bangladesh
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक, संगीतकार आणि चित्रकार सत्यजित रे यांच्या बांग्लादेशमधील वंशपरंपरागत घराच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (15 जुलै) बांग्लादेश सरकारला विनंती केली की, त्यांनी या ऐतिहासिक इमारतीच्या पाडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि भारत त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी मदत करायला तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
हे घर सुमारे 100 वर्षांपूर्वी बांग्लादेशातील मैमनसिंह येथे बांधले गेले होते. सत्यजित रे यांचे आजोबा आणि ख्यातनाम साहित्यिक उपेन्द्रकिशोर रे चौधुरी यांचे हे पुश्तैनी घर होते.
1947 साली भारताच्या फाळणीनंतर ही मालमत्ता बांग्लादेश सरकारच्या अधीन गेली. सध्या ही इमारत अत्यंत जर्जर अवस्थेत असून, तिचा वापर एका बाल अकादमीसाठी करण्यात येत होता.
मैमनसिंहमधील बाल कल्याण विभागाचे अधिकारी मोहम्मद मेहदी जमान यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही इमारत अनेक वर्षे वापराविना पडून होती आणि त्यात मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवताना सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला होता.
त्यामुळे ती पाडून नवीन सेमी-काँक्रिट इमारत उभारण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, “ही इमारत केवळ वास्तुशिल्प नव्हे, तर बंगालच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक आहे.
त्यामुळे तिला पाडण्याऐवजी साहित्य संग्रहालय किंवा भारत-बांग्लादेशच्या सांस्कृतिक ऐक्याचे प्रतिक म्हणून संरक्षित करणे अधिक उचित ठरेल.” भारत सरकारने त्यासाठी आवश्यक तांत्रिक व आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले, "ही इमारत बंगालच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहे.
बांग्लादेश सरकार आणि तेथील जागरूक नागरिकांनी या वारशाच्या जतनासाठी प्रयत्न करावेत." तसेच त्यांनी भारत सरकारला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते.
सत्यजित रे यांचा जन्म 2 मे 1921 रोजी कोलकात्यात झाला होता.
त्यांची ‘पाथेर पांचाली’ ही पहिली फिल्म आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गाजली.
‘अपु त्रयी’ (पाथेर पांचाली, अपराजितो, अपुर संसार) ही त्यांची सर्वात प्रसिद्ध ट्रिलजी आहे.
त्यांनी 37 चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यात फिचर फिल्म, डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश आहे.
ते एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत ज्यांना ऑस्करचा लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला आहे.
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (1965), पद्मविभूषण (1976) आणि भारतरत्न (1992 मरणोत्तर) या सर्वोच्च सन्मानांनी गौरविले आहे.
त्यांचे निधन 23 एप्रिल 1992 रोजी कोलकात्यात झाले.
सत्यजित रे हे केवळ भारताचे नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक वारशाचे अध्वर्यू होते. त्यामुळे त्यांचे घर म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे.
बांग्लादेश सरकारने ही बाब लक्षात घेऊन घर पाडण्याचा निर्णय थांबवावा आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक संग्रहालय स्थापन करण्याचा विचार करावा, अशी मागणी भारत सरकारसह अनेक सांस्कृतिक जाणिवा असलेल्या व्यक्तींनी केली आहे.