तापमान तेच, पण जाणवणारी उष्णता वेगळी! युरोपमध्ये 43°C भारतापेक्षा अधिक असह्य का ठरते? जाणून घ्या कारण.. file photo
आंतरराष्ट्रीय

Europe Heatwave : तापमान तेच, पण जाणवणारी उष्णता वेगळी! युरोपमध्ये 43°C भारतापेक्षा अधिक असह्य का ठरते? जाणून घ्या कारण..

तापमान समान, त्रास वेगळा! युरोपची 43°C उष्णता भारतापेक्षा अधिक धोकादायक का ठरते?

पुढारी वृत्तसेवा

why europe 43 degree celsius feels hotter than india scientific reason

पुढारी ऑनलाईन : सध्या युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर जाणवत आहे. या ठिकाणी तापमान 43°C पर्यंत पोहोचले आहे. त्‍यामुळे लोकांना ही उष्णता उसह्य होत असून अनेक लोकांचे जीवही गेले आहेत. या भीषण उष्णतेमुळे येथील शाळेंना सुट्ट्याही जाहीर केल्याचे समोर आले आहे.

एलिट केअर क्लिनिकचे सल्लागार फिजिशियन डॉ. पल्लेटी शिवा कार्तिक रेड्डी यांच्या मते, 43°C तापमान हे कोणत्याही देशात मानवी शरीरासाठी तितकेच आव्हानात्मक असते. मात्र, आजूबाजूचे वातावरण हे ठरवते की ही उष्णता प्रत्यक्षात किती धोकादायक ठरेल.

उन्हाळ्यात तापमान 43°C पर्यंत पोहोचले की घामाने अंग चिंब होणे स्वाभाविक आहे. सध्या केवळ भारतातच नव्हे, तर युरोपमधील लोकांनाही तीव्र उष्णतेचा मोठा फटका बसत आहे.

युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट

सध्या युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट (Heatwave) सुरू आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्वित्झर्लंड, पोलंड आणि नेदरलँड्स या देशांमध्ये तापमान 40 ते 45°C पर्यंत पोहोचले असून अनेक ठिकाणी जुन्या तापमानाच्या विक्रमांनाही मागे टाकले आहे.

भारतातही अनेक राज्यांमध्ये तापमान 45°C च्या पुढे गेले आहे. मात्र, एकाच तापमानातही युरोपमधील 43°C ची उष्णता भारतातील 43°C पेक्षा अधिक त्रासदायक का वाटते, असा प्रश्न अनेकांना पडतो.

सोशल मीडियावर रंगली चर्चा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर उमेद प्रताप सिंह यांनी प्रश्न विचारला, "युरोपमधील 43°C आणि भारतातील 43°C मध्ये फरक असतो का? भारतात तर तापमान 48°C पर्यंत जाते." ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी एकाच तापमानातही दोन्ही ठिकाणी उष्णतेचा अनुभव वेगळा का असतो, याबाबत चर्चा सुरू केली.

युरोपमधील 43°C अधिक असह्य का वाटते?

पहिल्या नजरेत ही गोष्ट आश्चर्यकारक वाटू शकते, पण यामागे ठोस वैज्ञानिक कारणे आहेत. हवामानतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, युरोपची भौगोलिक परिस्थिती, हवेतील आर्द्रता (Humidity), घरांची रचना आणि पायाभूत सुविधा यामुळे तेथील उष्णता अधिक त्रासदायक ठरते.

युरोपमधील बहुतांश घरे थंड हवामान लक्षात घेऊन बांधलेली आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये एअर कंडिशनर नसतात, पंख्यांचाही वापर कमी असतो. अनेक अपार्टमेंटमध्ये खिडक्या पूर्णपणे उघडता येत नाहीत. त्यामुळे घरातील उष्णता बाहेर पडत नाही. अशा परिस्थितीत 43°C तापमान प्रत्यक्षात 55°C इतके जाणवू शकते. याशिवाय किनारी भागांमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे 35°C तापमानही अत्यंत असह्य वाटू शकते.

डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

डॉ. रेड्डी यांच्या मते, तापमान समान असले तरी खालील घटक उष्णतेचा परिणाम ठरवतात:

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण

थेट सूर्यप्रकाश

वाऱ्याचा वेग

रात्री तापमान किती कमी होते

शहरांमध्ये उष्णता किती वेळ टिकून राहते

हे सर्व घटक शरीरावर होणारा उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात बदलतात.

मुंबईतील डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात की, 43°C तापमान कोणत्याही ठिकाणी शरीरावर ताण आणते. मात्र, उष्णता किती जाणवेल हे वातावरणावर अवलंबून असते. आर्द्रता जास्त असल्यास घाम लवकर वाफ होत नाही. तसेच काँक्रीटच्या इमारती आणि कमी वायुवीजनामुळे शरीराला थंड होणे कठीण जाते. त्यामुळे हीट एक्झॉशन (Heat Exhaustion) आणि हीट स्ट्रोक (Heat Stroke) यांचा धोका वाढतो.

भारत आणि युरोपमधील लोकांची उष्णता सहन करण्याची क्षमता वेगळी

डॉ. रेड्डी सांगतात की, भारतातील अनेक भागांमध्ये दरवर्षी दीर्घकाळ तीव्र उष्णता असते. त्यामुळे येथील लोकांचे शरीर आणि जीवनशैली या हवामानाशी बर्‍याच प्रमाणात जुळवून घेतलेली आहे.

याउलट, युरोपमध्ये पारंपरिकपणे उन्हाळा तुलनेने सौम्य असतो. त्यामुळे अचानक येणारी तीव्र उष्णतेची लाट तेथील नागरिकांसाठी आणि संपूर्ण यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरते.

शहरांची रचना देखील महत्त्वाची ठरते. ज्या शहरांमध्ये झाडे कमी, काँक्रीट जास्त आणि वाऱ्याची देवाणघेवाण कमी असते, तेथे समान तापमानही अधिक गरम जाणवते.

घरांची रचना आणि एअर कंडिशनरचे महत्त्व

डॉ. मंजुषा अग्रवाल यांच्या मते, ज्या घरांमध्ये एअर कंडिशनर नसतात, जिथे उष्णता अडकून राहील अशा प्रकारची रचना असते आणि नैसर्गिक वायुवीजन कमी असते, तेथे घरातील तापमान बराच काळ जास्त राहते.

यामुळे डिहायड्रेशन, हीट एक्झॉशन, हीट स्ट्रोक तसेच हृदय, फुफ्फुसे आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार गंभीर होण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो.

युरोपमधील घरे उष्णता अधिक वाढवतात

डॉ. रेड्डी यांच्या मते, युरोपमधील बहुतांश घरे दीर्घ आणि कडाक्याच्या थंडीचा विचार करून बांधलेली आहेत. त्यामध्ये जाड इन्सुलेशन, लहान खिडक्या आणि मर्यादित क्रॉस-व्हेंटिलेशन असल्यामुळे उन्हाळ्यात घरातील उष्णता बाहेर पडत नाही.

जेव्हा शरीर दीर्घकाळ अशा उष्ण वातावरणात राहते आणि पुरेसा गारवा मिळत नाही, तेव्हा शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होऊ लागते. परिणामी डिहायड्रेशन, हीट एक्झॉशन आणि हीट स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT