आंतरराष्ट्रीय

Iran Supreme Leader successor | इराणमध्‍ये खामेनींचा वारसदार कोण ? सर्वोच्‍च नेत्‍याची निवड कशी होते? कोण आहेत दावेदार?

Iran Supreme Leader successor | इराणमधील सत्तांतर अमेरिका-इस्रायलसाठी असणार मोठे आव्‍हान

पुढारी वृत्तसेवा

इराणच्या १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेचे हस्तांतरण होण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी १९८९ मध्ये क्रांतीचे प्रणेते आयतउल्ला रुहल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर सत्तेचे सत्तांतरण झाले होते.

Iran Supreme Leader successor

तेहरान: इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतउल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या रक्‍तरंजित संघर्षामुळे केवळ इराणमध्येच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशियात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, ८६ वर्षीय खामेनी यांनी आपला अधिकृत वारसदार नेमलेला नसल्यामुळे इराणचे नेतृत्त्‍व कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. जाणून घेवूया इराणमध्‍ये सर्वोच्‍च नेत्‍याची निवड कशी होते, तसेच खामेनी यांच्‍यानंतर या पदासाठीच्‍या दावेदारांविषयी....

खामेनी यांच्‍या निधनानंतर 'त्रिसूत्री' समिती

इराणच्या १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेचे हस्तांतरण होण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी १९८९ मध्ये क्रांतीचे प्रणेते आयतउल्ला रुहल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर सत्तेचे सत्तांतरण झाले होते. इराणच्या सरकारी टीव्‍हीने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च नेत्याच्या निवडीपर्यंत राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समिती देशाचा कारभार पाहणार आहे. या समितीमध्ये पेझेश्कियान यांच्यासह न्यायपालिका प्रमुख घुलमहुसेन मोहसेनी एजेई आणि घटनात्मक परिषदेचे एक सदस्य यांचा समावेश असेल.

इराणमध्‍ये सर्वोच्‍च नेत्‍याच्‍या निवडीची प्रक्रिया कशी राबवली जाते?

इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची जबाबदारी ८८ सदस्यीय 'अेंसेब्ली ऑफ एक्सपर्ट्स' या समितीवर असते. या समितीमधील शिया धर्मगुरूंची निवड दर आठ वर्षांनी जनतेद्वारे केली जाते. इराणच्या कायद्यानुसार, खामेनींच्‍या निधनानंतर या समितीला लवकरात लवकर नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करावी लागेल. तोपर्यंत 'लीडरशिप कौन्सिल' तात्पुरत्या स्वरूपात सर्व अधिकार हाताळेल.

सर्वोच्च पदाचे प्रबळ दावेदार

१. मोज्तबा खामेनी

खामेनी यांचा ५६ वर्षीय मुलगा मोज्तबा हा सर्वोच्‍च नेतेपदाच्‍या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. वडिलांच्या कट्टरवादी धोरणांचा तो खंबीर समर्थक आहे. मात्र, गेल्या महिन्यात इराणमधून १.५ अब्ज डॉलर्स बाहेर वळवल्याचा आरोप अमेरिकेने त्याच्यावर केला आहे.

२. हसन खामेनी

इस्लामिक क्रांतीचे जनक आयतउल्ला खोमेनी यांचा ५३ वर्षीय नातू हसन खामेनी याचे नावही चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर तो एक 'मध्यममार्गी' चेहरा म्हणून पाहिला जातो.

३. मरियम राजावी

पॅरिसस्थित 'नॅशनल कौन्सिल ऑफ रेसिस्टन्स ऑफ इराण'च्या (NCRI) प्रमुख मरियम राजावी यांनी देशातील अस्‍थिर राजकीय संधीचा फायदा घेत इराणमध्ये लोकशाही प्रजासत्ताक स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जनतेला आणि विशेषतः तरुणांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले असून सहा महिन्यांच्या संक्रमण काळासाठी आपला आराखडा तयार असल्याचे सांगितले आहे.

४. रेझा पेहलवी

इराणचे शेवटचे राजा (शहा) यांचे पुत्र रेझा पेहलवी यांनीही लोकशाही संक्रमणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या कारवाईचे स्वागत करत ही 'मानवतावादी हस्तक्षेप' असल्याचे म्हटले आहे. अंतिम विजय आमचाच असेल आणि इराणची जनताच हे काम पूर्ण करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ट्रम्‍प यांनी जनतेला केले सत्ता हाती घेण्‍याचे आवाहन

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला स्वतःच्या देशाची सत्ता हाती घेण्याचे आवाहन केले आहे. आमच्या संयुक्त कारवाईमुळे इराणच्या शूर जनतेला स्वतःचे नशीब स्वतःच्या हातात घेण्याची संधी निर्माण झाली आहे," असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT