

Iran Launches Fresh Airstrikes on Gulf Nations
दुबई/तेहरान: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आखाती देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. रविवारी पहाटे इराणने पुन्हा संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार आणि बहरीन मधील प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वर्षाव केला. दुबई, दोहा आणि मनामा या शहरांमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, या तिन्ही देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत.
जगातील सर्वात व्यस्त असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने हल्ला केल्याचे वृत्त समजताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. टर्मिनलमध्ये धूर पसरल्याने प्रवाशांची पळापळ सुरू झाली, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या हल्ल्यात एका टर्मिनलचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दुबईतील दोन्ही मुख्य विमानतळांवरील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत.
दुबई: पाम जुमेराह भागातील आलिशान 'फेअरमोंट हॉटेल'वर स्फोट होऊन आग लागली.
कतार: राजधानी दोहाच्या आकाशात शनिवारी रात्री काही क्षेपणास्त्रे रोखण्यात आली.
बहरीन: मनामा येथील बहरीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला झाला असून एका निवासी इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे.
कुवेत: २८ फेब्रुवारी रोजी कुवेत विमानतळाच्या टर्मिनल-१ वर झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही कर्मचारी जखमी झाले असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत आखाती देशांतील अमेरिकन तळांना आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षात केवळ ओमान हा एकमेव देश अद्याप सुरक्षित आहे.
वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेतील मोठा हवाई मार्ग (Airspace) बंद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपल्या अनेक फेऱ्या रद्द केल्या असून उड्डाणांचे मार्ग बदलले आहेत. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आखाती देशांमधील पर्यटन आणि व्यापार केंद्रांना थेट लक्ष्य केल्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.