पोप फ्रान्सिस  File Photo
आंतरराष्ट्रीय

कोण होणार नवीन पोप? निधनानंतर का फोडली जाते पोप यांची अंगठी? जाणून घ्या सविस्तर...

Who will be New Pope: नवीन पोप निवडीसाठी सुमारे 120 कार्डिनल्स करतात मतदान

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी जगभरातील 12 प्रमुख कार्डिनल्सच्या नावांवर चर्चा सुरू झाली आहे.

पोपपदाच्या निवडीसंदर्भातील ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि आध्यात्मिक असली तरी काही नावं माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. त्यांच्याविषयी तसेच पोप यांच्या निधनानंतर अंत्यंसंस्कार, शोकविधी, नवीन पोप निवड प्रक्रिया कशी असते तेदेखील या लेखात जाणून घेऊया... (Who will be New Pope)

कॅमेरलेंगोची जबाबदारी

पोप यांच्या निधनाची अधिकृत खातरजमा व्हॅटिकनचा वैद्यकीय विभाग आणि कॅमेरलेंगो करतो. कॅमेरलेंगो (Camerlengo) ही व्हॅटिकनमधील एक अतिशय महत्त्वाची प्रशासकीय भूमिका आहे.

पोपच्या मृत्यूनंतर किंवा राजीनाम्यानंतर, संपूर्ण चर्च "sede vacante" अवस्थेत असते—म्हणजे पोप नाही. अशावेळी कॅमेरलेंगो हा पोपच्या अनुपस्थितीत चर्चच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळतो.

त्याच्या जबाबदाऱ्या-

  • पोपच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करणे

  • "फिशरमॅन रिंग" विधिपूर्वक फोडणे

  • व्हॅटिकनची आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था पाहणे

  • नव्या पोपच्या निवडीसाठीची तयारी करणे

पोप यांची अंगठी फोडतात...

मृतदेह खास खाजगी प्रार्थना कक्षात ठेवला जातो, त्याला पांढऱ्या वस्त्रात आणि झिंकयुक्त लाकडी ताबूतात ठेवले जाते.

पोपचा "फिशरमॅन रिंग" विधिपूर्वक फोडला जातो, जेणेकरून त्यांच्या पदाचा शेवट अधिकृतपणे दर्शवता येतो. ही अंगठी म्हणजे पोप यांचे अधिकृत सील किंवा मुद्रांक असतो.

या अंगठीवर सेंट पीटर (जे ख्रिस्ताचे शिष्य आणि पहिले पोप मानले जातात) यांना मासेमारी करताना दाखवलेलं चित्र कोरलेलं असतं — म्हणून याला "फिशरमॅन रिंग" म्हणतात.

या अंगठीचा उपयोग पोप अधिकृत दस्तऐवजांवर शिक्का मारण्यासाठी करतात. पोपच्या मृत्यूनंतर ही अंगठी विधिपूर्वक फोडली जाते, जेणेकरून तिचा दुरुपयोग होऊ नये.

नऊ दिवसांचा शोकविधी

व्हॅटिकन नऊ दिवसांच्या शोकविधीची घोषणा करतो. यामध्ये जनतेला श्रद्धांजली वाहता यावी म्हणून पोप यांचा मृतदेह सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये ठेवला जातो. ही सर्व प्रक्रिया साध्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा आहे, कारण पोप फ्रान्सिस यांनीच तसे स्पष्ट केले होते.

अंत्यसंस्कार व समाधीस्थळ

पोप फ्रान्सिस यांचे अंत्यसंस्कार निधनानंतर 4–6 दिवसांनी होण्याची शक्यता आहे. पारंपरिक तीन ताबूताऐवजी, सिंगल झिंक-अस्तर असलेला लाकडी ताबूत वापरण्यात येईल.

ताबूतात त्यांचे आयुष्य आणि कार्य सांगणारा दस्तऐवज (Rogito) आणि काही नाणी ठेवली जातात. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना St. Mary Major बॅसिलिकामध्ये पुरण्यात येईल.

काँक्लेव्ह आणि नवीन पोपची निवड

पोप यांच्या निधनानंतर 15-20 दिवसांत काँक्लेव्ह भरते. 80 वर्षाखालील कार्डिनल्स यामध्ये मतदान करतात. लेखक डॅन ब्राऊन यांच्या 'एंजल्स अँड डेमन' या कादंबरीत नवीन पोप यांची निवड कशी केली जाते, याचे सविस्तर विवेचन आले आहे.

  • पोप निवडीसाठीची प्रक्रिया व्हेटिकन सिटीमध्ये सिस्टीन चॅपेलमध्ये चेंबरलिन चर्चच्या देखरेखीखाली पार पडते.

  • जगभरातील कार्डिनल नवीन पोप निवडण्यासाठी मतदान करतात. त्यासाठी ते व्हॅटिकन सिटीमध्ये येतात.

  • केवळ 80 वर्षांखालील वयाचे कार्डिनल्सच या मतदानात सहभागी होऊ शकतात.

  • कार्डिनल ही रोमन कॅथोलिक चर्चमधील एक उच्च पदवी आहे, जे पोपचे सल्लागार म्हणून काम करतात

  • मतदानाआधी एक धार्मिक सभा होते. ज्यात कार्डिनल सहभागी होतात. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होते.

  • सिस्टीन चॅपेलमध्ये दररोज चार वेळा मतदान केले जाते, जोपर्यंत एखाद्या उमेदवाराला दोन-तृतीयांश मतं मिळत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवली जाते.

  • 21 एप्रिल 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार सध्या एकूण 252 कार्डिनल आहेत, परंतु नव्या पोपच्या निवडीसाठी फक्त 138 कार्डिनल पात्र आहेत.

  • नव्या पोपच्या निवडीचा संकेत सिस्टीन चॅपेलच्या छतावरील चिमणीतून येणाऱ्या धुराद्वारे मिळतो. जर चिमणीतून पांढरा धूर निघाला, तर याचा अर्थ नव्या पोपची निवड झाली आहे. काळा धूर निघाला, तर याचा अर्थ निवड अद्याप झाली नाही आणि प्रक्रिया सुरूच आहे.

  • मतदानात अऩेक सत्रांमध्ये कार्डिनल्स गुप्त मतपत्राद्वारे मतदान करतात. प्रत्येक सत्रानंतर ते मतपत्र जाळून टाकले जाते. जोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला दोन-तृतीयांश, म्हणजेच 77 मते मिळत नाहीत, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.

यांच्यापैकी एकाला पोप म्हणून संधी मिळणार का? 

दरम्यान, पुढील काळात कोण पोप म्हणून विराजमान होऊ शकेल याबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी शक्यता वर्तवल्या आहेत. त्यामध्ये खालील कार्डिनल्सचा समावेश आहे.

  1. पिएत्रो पेरोलिन (वय: 70) : पेरोलिन हे इटलीतील कार्डिनल असून व्हॅटिकनचे राज्य सचिव (Secretary of State) आहेत. कुशल मुत्सद्दी आणि जागतिक चर्चेतील महत्त्वाचा चेहरा मानला जातात. अमेरिका-क्युबा करार आणि चीनसंदर्भातील वाटाघाटींमध्ये त्यांचा सहभाग होता.

  2. पियरबातिस्ता पिझाबल्ला (वय: 59) : पिझाबल्ला देखील इटलीतील कार्डिनल आहेत. त्यांनी जेरूसलेममध्ये 30 वर्षे सेवा बजावली आहे. हिब्रू भाषिक ख्रिस्ती लोकांसोबत त्यांनी कार्य केले आहे. फ्रान्सिस्कन समुदायाचे ते माजी प्रमुख आहेत.

  3. मारियो ग्रेक (वय: 68) :ग्रेक हे युरोपमधील कार्डिनल असून माल्टा या देशाचे आहेत. ते बिशप्सच्या सिनॉडचे महासचिव आहेत. "सिनॉडल चर्च" या फ्रान्सिस यांच्या संकल्पनेचा ते आधारस्तंभ मानले जातात.

  4. पीटर एर्दो (वय: 72) : युरोपमधील आणखी एक कार्डिनल असलेले एर्दो हे हंगेरीचे आहेत. ते बुडापेस्टचे आर्चबिशप आहेत. ते कायदेतज्ज्ञ आहेत तसेच विचाराने थोडे पुराणमतवादी पण लवचिक आहेत.

  5. सर्जिओ दा रोचा (वय: 65) :लॅटिन अमेरिकेतील कार्डिनल रोचा हे ब्राझिलचे आहेत. सर्वाधिक ख्रिस्ती असलेल्या देशातील ते प्रमुख धर्मगुरू आहेत. तरुणांसाठी 2018 च्या सिनॉडमध्ये सक्रिय भूमिका निभावली होती.

  6. कार्लोस अगुआर रेटेस (वय: 75) : लॅटिन अमेरिकेतील आणखी एक कार्डिनल म्हणजे रेटेस. ते मेक्सिको सिटीचे आर्चबिशप आहेत. लॅटिन अमेरिका बिशप्स कॉन्फरन्सचे नेते होते.

  7. लुईस अँटोनियो टागले (वय: 67) :आशिया खंडातील फिलिपाईन्सचे लुईस टागेल हे फिलिपाईन्सचे असून ते प्रचार विभागाचे प्रमुख आहेत. इंग्रजीवर प्रभुत्व, मीडिया फ्रेंडली असे त्यांचे व्यक्तिमत्व असूनते फ्रान्सिस यांच्या धोरणांचे समर्थक मानले जातात.

  8. लाझारस यू ह्युंग-सिक (वय: 73) :व्हॅटिकनच्या पुरोहित कार्यालयाचे प्रमुख असलेले सिंक हे दक्षिण कोरियाचे आहेत.

  9. पीटर टर्कसन (वय: 76) :आफ्रिका खंडातील घाना या देशालीत टर्कसन यांनी पोप फ्रान्सिस यांच्या ‘Laudato Si’ या पत्रकाचे सहलेखन केले होते. बहुभाषिक, अभ्यासक असले तरी त्यांना फारसा प्रशासकीय अनुभव नाही, असे सांगितले जाते.

  10. फ्रिडोलिन आंबोंगो बेसुंगो (वय: 65) :आफ्रिका खंडातील कांगो देशाचे बेसुंगो हे किंशासा (70 लाख ख्रिस्ती) चे आर्चबिशप आहेत. नम्र, शांततावादी आणि फ्रान्सिस्कन धर्मसंघाचे सदस्य अशी त्यांची ओळख आहे.

  11. मायकेल चेर्नी (वय: 78) : कॅनडाचे चेर्नी हे स्थलांतरीतांच्या व मानवी हक्कांवर काम करतात. ते स्वतःही स्थलांतरीत आहे. सध्या ते व्हॅटिकनच्या मानवविकास विभागाचे प्रमुख

  12. जोसेफ टोबिन (वय: 72) :अमेरिकेतील नेवार्कचे आर्चबिशप टोबिनहे अप्रवासी हक्कांचे समर्थक आणि सिनॉड प्रक्रियेत सक्रिय असणारे कार्डिनल आहेत.

पोप निवड प्रक्रियेतील कोणतेही नाव निश्चित नसते. कार्डिनल्स एकत्र येऊन चर्चच्या सध्याच्या गरजांनुसार योग्य व्यक्तीची निवड करतात.

कोणताही उमेदवार स्वतःची उमेदवारी घोषित करत नाही. यामागे केवळ आध्यात्मिक प्रवृत्ती, अनुभव आणि चर्चची दिशा या आधारावर निर्णय घेतला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT