Trump Putin Alaska Summit
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलास्कामध्ये भेट झाली. उभय नेत्यांमध्ये सुमारे ३ तास द्विपक्षीय चर्चा झाली. ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत रशिया आणि त्यांच्या भागीदारी देशांबाबत आक्रमक भूमिका घेतली. पण पुतीन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी टॅरिफबाबत सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून आले.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दोन अथवा तीन आठवड्यात टॅरिफ लागू करण्यावर विचार केला जाऊ शकतो, पण त्यांचा रशियाच्या व्यापारी भागीदारी देशांवर अतिरिक्त टॅरिफ लागू करण्याचा तत्काळ विचार नाही.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, ट्रम्प यांची युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रशियाबद्दलची त्यांची भूमिका सौम्य दिसून आली. अलास्का शिखर परिषद चांगली झाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याला त्यांनी १०/१० असे रेटिंग दिले आहे.
"मला दोन-तीन आठवड्यांत विचार करावा लागू शकतो. पण आपल्याला यावर तत्काळ विचार करण्याची गरज नाही," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प -पुतीन यांच्या भेटीत रशिया-युक्रेन युद्धबंदीवर कोणताही करार झाली नाही. त्यांची संयुक्त पत्रकार परिषदही काही मिनिटांतच आटोपली. दरम्यान, उभय नेत्यांनी अमेरिका-रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे भविष्य आणि युक्रेनमधील युद्धाबद्दल सावध आशावाद व्यक्त केला.
ट्रम्प यांनी सुरुवातीला भारतावर २५ टक्के टॅरिफ केले. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे सांगत ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादून भारताला धक्का दिला. यामुळे भारतीय आयातीवरील एकूण टॅरिफ ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना इशारा दिला की, दुहेरी टॅरिफदेखील लवकरच लागू केले जाईल. कारण चीन आणि भारत हे रशियाच्या तेलाचे दोन प्रमुख खरेदीदार देश आहेत.
अलास्का शिखर परिषदेच्या काही दिवस आधी, ट्रम्प यांनी असा दावा केला होता की भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे त्यांना ट्रम्प यांची भेट घेण्याची विनंती करावी लागली. कारण रशियाला त्यांचा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार गमावावा लागत होता. दरम्यान, ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरुच ठेवले आहे, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले.