Iran America Conflict |अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर आज हल्ला केला. फोर्डा, नतान्झ आणि इस्फहान येथील अणुकेंद्रांना आम्ही लक्ष्य केल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर भडकलेल्या इराणने अमेरिकेला धमकी दिली आहे. यापुढे पश्चिम आशियातील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि लष्करी कर्मचारी आमच्या टार्गेटवर असल्याचे इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलने म्हटलं आहे.
अमेरिकेने इराणच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत इराणविरुद्ध गुन्हा केला आहे. आता यापुढे पश्चिम आशियाई प्रदेशात त्याचे कोणतेही स्थान नाही. अमेरिकेचे अध्यक्ष, तुम्ही ते सुरू केले पण याचा शेवट आम्हीच करु " असे इराणमधील सरकारी टीव्ही चॅनेनलेन अमेरिकेच्या तळांचे ग्राफिक प्रदर्शित करताना म्हटले आहे.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या काही तास आधी, इराणचे संरक्षण मंत्री अझीझ नासिरजादेह यांनी अमेरिकेला हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. इराणचे संरक्षण मंत्री म्हणाले, 'सर्व अमेरिकन तळ आमच्या आवाक्यात आहेत आणि जर अमेरिका हल्ला करेल तर आम्ही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देवू. सध्या, मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर सुमारे ४०,००० अमेरिकन सैनिक काम करत आहेत. याची संख्या नेहमीपेक्षा दहा हजारांनी जास्त आहे. हे तळ इराणच्या क्षेपणास्त्रांच्या थेट रेंजमध्ये आहेत.
इराणी टीव्हीने दावा केला की, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात फोर्डो अणुसुविधेच्या प्रवेश बोगद्यांनाच नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की फोर्डो येथील मुख्य सुविधेला कोणतेही नुकसान झालेले नाही.
इराणची अणुबॉम्ब क्षमता नष्ट करणे हेच आमचे उद्दिष्ट होते. मध्य-पूर्वेत दादागिरी करणाऱ्या इराणने आता शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. नाहीतर भविष्यात हल्ले अधिक भीषण करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. इराण-इस्रायल संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की इराणकडे अजूनही शांततेच्या मार्गावर परतण्यासाठी वेळ आहे. त्यांना हे युद्ध संपवावे लागेल. जर इराणने आताही हल्ला केला तर आम्हीही हल्ला करू. जर शांतता नसेल तर विनाश होईल. अद्याप सर्व लक्ष्यांवर हल्ला झालेला नाही. आम्ही पश्चिम आशियात दादागिरी दाखवणाऱ्या इराणच्या अणुप्रकल्पांना पूर्णपणे नष्ट करू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. नेतान्याहू यांनी म्हटलं आहे की, "धन्यवाद अध्यक्ष ट्रम्प, तुम्ही इराणमधील अणु तळांवर हल्ला करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. हे इतिहास बदलेल. इस्रायलने म्हटले आहे की ते इराणविरुद्ध "दीर्घ मोहिमेसाठी" सज्ज आहे. आम्ही इराणमधील अणु आणि लष्करी स्थळांवर हल्ला करत आहोत. गेल्या आठवड्यात संघर्ष वाढल्यापासून इस्रायलमध्ये अधिकाऱ्यांनी किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.