न्यू यॉर्क : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी अखेर त्यांच्या बर्कशायर हाथवे या 1.18 ट्रिलियन डॉलर्सच्या (1 लाख 18 हजार कोटी रूपये ) गुंतवणूक साम्राज्याचे नेतृत्व सोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
62 वर्षांचे कॅनडियन कार्यकारी अधिकारी आणि बर्कशायरमधील ज्येष्ठ सदस्य ग्रेग एबेल यांना बफेट यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. ग्रेग एबेल हे बर्कशायर हाथवे कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.
शनिवारी झालेल्या बर्कशायर हातवेच्या वार्षिक भागधारक सभेत वॉरेन बफेट यांनी वर्षाअखेर CEO पदावरून निवृत्ती घेण्याची अधिकृत घोषणा केली.
वय: ६२ वर्षे
मूळ: एडमंटन, अल्बर्टा, कॅनडा
सध्याचे पद: बर्कशायर हाथवेचे नॉन-इन्शुरन्स बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष
बर्कशायरमध्ये सहभाग: 1992 पासून (MidAmerican Energy द्वारे)
एबेल यांनी 1984 मध्ये University of Alberta मधून पदवी घेतली
नंतर PricewaterhouseCoopers आणि CalEnergy मध्ये काम केले.
व्यवसायातील नेतृत्व व यश
ग्रेग एबेल यांनी बर्कशायरच्या विविध व्यवसायांवर यशस्वीपणे नियंत्रण ठेवले आहे. यामध्ये प्रमुख कंपन्या आहेत: BNSF Railway (रेल्वे परिवहन), See’s Candies (गोडधोड निर्मिती), Dairy Queen (आईसक्रीम चेन), Shaw Industries, Borsheims इत्यादी.
ग्रेग एबेल यांनी गेल्या दशकभरात वॉरन बफेट यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी बर्कशायर हॅथवे एनर्जी या उपकंपनीचे 2011 पासून नेतृत्व केले असून कंपनीच्या वीज व ऊर्जा व्यवसायाला नव्या उंचीवर पोहचवले आहे.
वॉरेन बफेट यांनी स्पष्ट केले आहे की 2025 मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या एकमताने ग्रेग एबेल यांची CEO म्हणून औपचारिक निवड होणार आहे. ग्रेग एबेल माझ्यापेक्षा खूप मेहनती आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणे खूप चांगले आहे.
बर्कशायरमधील वरिष्ठ अधिकारी आणि CEO मंडळी ग्रेग एबेल यांच्या व्यावसायिक समज, संयम आणि अंतःप्रेरणा यांचे कौतुक करतात. Dairy Queen चे CEO ट्रॉय बेडर म्हणतात, "वॉरन बफेट यांच्याकडे जी अंतःप्रेरणा आहे, त्यात ग्रेग एबेलही कमी नाही."
बर्कशायरचे संचालक रॉन ऑल्सन म्हणतात, बफेट यांच्यासारखी लोकप्रियता किंवा प्रसिद्धी ग्रेग एबेल यांच्याकडे नसली तरी, त्यांच्याकडे प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि शांत नेतृत्वशैली आहे. ते दुसरे वॉरेन बफेट नाहीत, पण त्यांच्याकडे बफेट यांसारखी अनेक मूलभूत मूल्यं आहेत."
ग्रेग एबेल यांचे बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेले. त्यांनी लहानपणी रिकाम्या बाटल्या गोळा करणे, फायर एक्स्टिंग्विशर भरून देणे अशी कामे केली.
त्या काळातील कष्ट, जिद्द आणि शिस्त यांनी त्यांचा व्यवसायातील दृष्टिकोन घडवला. कचऱ्यापासून सुरवात करत मोठ्या कंपनीच्या सीईओपर्यंत त्यांनी झेप घेतली आहे.
सध्या मुख्यालयात न जाता आयोवा येथूनच काम करणार
एबेल हे सध्या ओमाहा येथील बर्कशायरच्या मुख्यालयात जाणार नाहीत. ते सध्या आयोवा, डेस मोईन्स येथे वास्तव्यास आहेत आणि आपल्या मुलांच्या हॉकी-सॉकर टीमचे प्रशिक्षकही आहेत.
वॉरेन बफेट आणि चार्ली मंगर यांचं "डिसेंट्रलाइज्ड लीडरशिप" मॉडेल पुढे चालवण्याचा त्यांचा निर्धार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आता एबेल यांच्या कामकाजाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.