US Embassy India visa rules social media background check USA visa requirements visa denial for hiding social media
नवी दिल्ली : अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करत असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना आता त्यांच्या मागील पाच वर्षांतील सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती DS-160 व्हिसा अर्जात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यूएस दूतावासाने दिलेल्या निवेदनानुसार, जर अर्जदारांनी ही माहिती दिली नाही किंवा चुकीची माहिती दिली, तर त्यांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो आणि भविष्यातील व्हिसा अर्जांमध्येही त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.
दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील हँडल्सबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. "व्हिसा अर्जदारांनी मागील 5 वर्षांत वापरलेले सर्व सोशल मीडिया युजरनेम्स किंवा हँडल्स DS-160 अर्जावर नमूद करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करताना अर्जदार या माहितीची सत्यता आणि अचूकता असल्याचे प्रमाणित करतात," असे दूतावासाने X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्टद्वारे सांगितले.
दूतावासाने पुढे स्पष्ट केले की, "सोशल मीडिया माहिती देण्यात चूक किंवा दुर्लक्ष केल्यास व्हिसा नाकारला जाऊ शकतो आणि अर्जदार भविष्यातही व्हिसासाठी अपात्र ठरू शकतो."
ही अट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाचा भाग असून व्हिसा प्रक्रियेची सुरक्षितता व पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
याच आठवड्यात, यूएस स्टेट डिपार्टमेंटने विद्यार्थी व्हिसा अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केल्यानंतर, यूएस दूतावासाने एफ (F), एम (M), आणि जे (J) प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोशल मीडिया अकाउंट्स ‘पब्लिक’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
"F, M, किंवा J व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया खात्यांची गोपनीयता (Privacy Settings) ‘Public’ करावी, जेणेकरून यूएस कायद्यांनुसार त्यांची ओळख व पात्रता तपासण्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी तपासणी सुलभ होईल," असेही दूतावासाने X वर नमूद केले आहे.
अर्ज करताना सोशल मीडिया हँडल्स (उदा. Facebook, Twitter/X, Instagram, YouTube, Reddit, TikTok, LinkedIn इ.) मागील 5 वर्षांपासून वापरले असल्यास त्यांची माहिती देणे बंधनकारक आहे.
माहिती लपवणे किंवा खोटी माहिती देणे हे गंभीर उल्लंघन मानले जाईल.
व्हिसा अर्ज सादर करताना दिलेली माहिती खरी असल्याची शपथ घेण्यात येते.
ही नवीन अट लक्षात घेऊन सर्व अर्जदारांनी काळजीपूर्वक माहिती भरावी, अन्यथा भविष्यातील अमेरिकन व्हिसासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.