Venezuela Maria Corina Machado Narendra Modi
दिल्ली : व्हेनेझुएलामध्ये दोन दशकांहून अधिक काळ लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष करणाऱ्या आणि २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी भारताला 'महान लोकशाही' आणि इतर देशांसाठी 'एक उदाहरण' म्हणून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लवकर संवाद साधण्याची आणि स्वतंत्र व्हेनेझुएलामध्ये त्यांचे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच व्हेनेझुएलाला लोकशाहीच्या बाजूने भारताच्या आवाजाची गरज असल्याचे म्हटले आहे.
गेल्या पंधरा महिन्यांपासून अज्ञात ठिकाणी असलेल्या मचाडो यांनी 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, व्हेनेझुएलामध्ये शांततापूर्ण मार्गाने लोकशाहीचे संक्रमण झाल्यानंतर, भारत हा त्यांचा 'महान सहयोगी' ठरू शकतो. भारत आणि व्हेनेझुएला संबंध अधिक मजबूत करू शकतील. एकीकडे व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यातच व्हेनेझुएलासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका युद्धाच्या तयारीत आहे. नुकतेच अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात आपली विमानवाहू युद्धनौका, ५ हजार सैनिक आणि ७५ लढाऊ विमानं तैनात केली असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मचाडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीसाठी भारताने आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
भारताच्या जागतिक भूमिकेबद्दल बोलताना माचाडो म्हणाल्या,"भारत अनेक देशांसाठी, अनेक पिढ्यांसाठी, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून एक उदाहरण आहे. ही एक मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे तुमच्यावर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. जगभरातील अनेक देश तुमच्याकडे आशेने पाहतात. लोकशाही कायम मजबूत ठेवली पाहिजे आणि तिला कधीही गृहीत धरू नये.
मचाडो यांनी महात्मा गांधींच्या अहिंसक स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेतल्याचेही सांगितले. "शांततापूर्ण असणे ही कमजोरी नाही आणि गांधींनी संपूर्ण मानवतेला त्याचा अर्थ काय असतो हे दाखवले. मी भारतावर मनापासून प्रेम करते. माझी मुलगी काही महिन्यांपूर्वी भारतात आली होती, पण मी कधी भारतात आले नाही. तिला भारत खूप आवडतो. माझे अनेक व्हेनेझुएलन मित्र भारतात राहतात. मी भारतीय राजकारणाचेही बारकाईने निरीक्षण करते.”
त्या पुढे म्हणाल्या, “व्हेनेझुएलातील लोकांच्या हक्कांसाठी आणि जनतेच्या सार्वभौमत्वासाठी भारतासारख्या महान लोकशाहीचा आवाज आम्हाला आवश्यक आहे. व्हेनेझुएलामध्ये एकदा लोकशाही स्थिर झाली आणि आम्ही या गुन्हेगारी समाजवादी रचनेचे उच्चाटन केले, तर भारतीय कंपन्यांसाठी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि दूरसंचार क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.”