डोनाल्‍ड ट्रम्‍प. File Photo
आंतरराष्ट्रीय

US Visa : अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराण आणि अफगाणिस्तानसह ७५ देशांच्या व्हिसावर बंदी; नेमकं कारण काय ?

दूतावास अधिकाऱ्यांना विद्यमान कायद्यांतर्गत व्हिसा नाकारण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

US Visa Restrictions

वॉशिंग्टन: अमेरिकेने एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाद्वारे जगातील ७५ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने (परराष्ट्र विभाग) या ७५ देशांमधील व्हिसा प्रक्रिया तातडीने रोखली असून, यामध्ये रशिया, अफगाणिस्तान आणि इराणसारख्या प्रमुख देशांचा समावेश आहे. अमेरिकेच्या तिजोरीवर आणि सार्वजनिक सुविधांवर भार ठरू शकणाऱ्या अर्जदारांना रोखणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

तपासणी प्रक्रियेचे होणार पुनर्मूल्यांकन

'फॉक्स न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, स्टेट डिपार्टमेंटने एका निवेदनाद्वारे दूतावास अधिकाऱ्यांना विद्यमान कायद्यांतर्गत व्हिसा नाकारण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या विभाग आपली स्क्रीनिंग (तपासणी) आणि सुरक्षा प्रक्रियांचे पुनर्मूल्यांकन करत आहे. या ७५ देशांच्या यादीत सोमालिया, रशिया, अफगाणिस्तान, ब्राझील, इराण, इराक, इजिप्त, नायजेरिया, थायलंड, येमेन आणि इतर देशांचा समावेश आहे. या देशांतील नागरिकांना आता अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात अडचणी येणार आहेत.

२१ जानेवारीपासून अंमलबजावणी

ही बंदी २१ जानेवारीपासून लागू होणार असून, व्हिसा प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत ती अनिश्चित काळासाठी सुरू राहील. विशेष म्हणजे, मिनेसोटा येथील एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यानंतर सोमालिया अमेरिकन प्रशासनाच्या रडारवर आले आहे. या घोटाळ्यात अनेक सोमाली नागरिक आणि सोमाली-अमेरिकन लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले होते.

स्क्रीनिंगचे नवे कडक नियम

नोव्हेंबर २०२५ मध्येच अमेरिकन परराष्ट्र विभागाने जगभरातील आपल्या दूतावासांना 'सार्वजनिक भार' या तरतुदींतर्गत कडक स्क्रीनिंग करण्याचे आदेश दिले होते. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जे अर्जदार भविष्यात अमेरिकेच्या सरकारी लाभांवर किंवा मदतीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे, त्यांना व्हिसा नाकारला जाईल. यासाठी अर्जदाराचे आरोग्य, वय, इंग्रजी भाषेतील नैपुण्य, आर्थिक स्थिती आणि दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची गरज यांसारख्या निकषांची तपासणी केली जाणार आहे. दरम्‍यान, अमेरिकन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी स्पष्ट केले की, "जे संभाव्य स्थलांतरित अमेरिकेवर आर्थिक भार बनतील आणि येथील जनतेच्या उदारतेचा गैरफायदा घेतील, त्यांना अपात्र ठरवण्यासाठी विभाग आपल्या दीर्घकालीन अधिकारांचा वापर करत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT