अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हॅन्स यांच्या ओहायो राज्यातील सिनसिनाटी येथील निवासस्थानावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
आंतरराष्ट्रीय

JD Vance | धक्कादायक..! अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांच्या निवासस्थानावर हल्ला; खिडक्यांच्या काचा फोडल्या

एक संशयित ताब्यात; हल्‍ल्‍यामागील कारणाचा तपास सुरु

पुढारी वृत्तसेवा

JD Vance house attack

न्‍यूयॉर्क : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांच्या सिनसिनाटी येथील निवासस्थानावर मध्यरात्री अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घराच्या अनेक खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून, या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिनसिनाटीमधील 'ईस्ट वॉलनट हिल्स' भागातील व्हॅन्स यांच्या निवासस्थानी घडली. मध्यरात्री सुमारे १२:१५ च्या सुमारास सीक्रेट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्याने निवासस्थानाजवळ एका व्यक्तीला पूर्व दिशेला पळताना पाहिले. यानंतर तत्काळ स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सीक्रेट सर्व्हिसचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच एका संशयित व्यक्तीला परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

हल्‍लेखोराला घरात घुसखोरी करता आली नाही

'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री १२:१५ च्या सुमारास व्हॅन्स यांच्या घराच्या परिसरात एका व्यक्तीला पळताना पाहिले गेले. ही घटना घडली तेव्हा सुदैवाने व्हॅन्स आणि त्यांचे कुटुंबीय घरात उपस्थित नव्हते. मात्र, या व्यक्तीची ओळख आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, याबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. प्राथमिक तपासानुसार, संशयित व्यक्तीने उपराष्ट्रपतींच्या घरात प्रवेश केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

व्हाईट हाऊसकडून अधिकृत वक्तव्य नाही

या हल्ल्यामागील उद्देश नेमका काय होता, याचा तपास सध्या सुरक्षा यंत्रणा करत आहेत. हा हल्ला मुद्दाम जेडी व्हॅन्स किंवा त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी केला होता की, यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.या गंभीर घटनेनंतर व्हाईट हाऊस आणि सीक्रेट सर्विसकडून माहिती मागवण्यात आली आहे. मात्र, अद्याप या दोन्ही संस्थांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

कडक बंदोबस्तातही हा हल्ला झाल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेकडून सुरू असलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर, उपराष्ट्रपती व्हॅन्स गेल्या आठवड्यात फ्लोरिडातील 'मार-ए-लागो' येथे ट्रम्प आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उपस्थित नव्हते. सुरक्षेच्या कारणास्तव आणि मोहिमेची गोपनीयता राखण्यासाठी ते या प्रक्रियेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर ते सिनसिनाटीला परतले होते. नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात आधीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. व्हॅन्स यांच्या घरासमोरील रस्ते काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आले होते आणि ठिकठिकाणी तपासणी नाके (Checkpoints) उभारण्यात आले होते. या कडक बंदोबस्तातही हा हल्ला झाल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्रपती यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी राहणे टाळण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT