Trump Tariffs
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफवरुन मोठे वक्तव्य केले आहे. "जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही," असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवले. पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात २७ ऑगस्टपासून अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केले जाणार आहे. भारताने हा निर्णय एकतर्फी असल्याचे म्हटले आहे.
रशियाशी व्यापार संबंध असणाऱ्या देशांवर दुहेरी निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी याआधी दिला होता. आता त्यांना इतर देशही रशियाकडून तेल खरेदी करत असताना केवळ भारतालाच का लक्ष्य केले जात आहे? असा प्रश्न त्यांना करण्यात आल्यानंतर भारताबाबत त्यांनी नवीन वक्तव्य केले आहे.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की भारतासोबतची द्विपक्षीय व्यापार चर्चा थांबविण्यात आली आहे. ५० टक्के टॅरिफ लागू करण्याच्या घोषणेनंतर भारतासोबत द्विपक्षीय व्यापार वाटाघाटी वाढतील का?, असा प्रश्न एएनआयच्या पत्रकारांनी विचारला असता, ट्रम्प यांनी टॅरिफवरून त्यांची भूमिका स्पष्ट केली. "नाही..., जोपर्यंत आम्ही तोडगा काढत नाही, तोपर्यंत नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
भारत शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही आणि गरज पडल्यास वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत मोजण्यास तयार आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीत आयोजित तीन दिवसीय जागतिक परिषदेत बोलताना केले. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्क्यांपर्यंत लादलेल्या टॅरिफनंतर पीएम मोदींनी हे विधान करुन एकप्रकारे अमेरिकेला संदेश दिला आहे.