Viral News:
वॉशिंग्टन: अमेरिकेतील रोनाल्ड रेगन नॅशनल एअरपोर्टजवळ काही वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रेडिओ चॅनेलवर चक्क मांजरासारखे ओरडण्याचे आणि कुत्र्यासारखे भुंकण्याचे आवाज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आकाशात हजारो फूट उंचीवरून प्रवास करत असताना वैमानिकांकडून अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक वर्तनाची अपेक्षा असते. मात्र, अमेरिकेत ही संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना १२ एप्रिल रोजी घडली. 'ATC.com' या विमान वाहतूक क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइटने या संभाषणाचे रेकॉर्डिंग प्रसिद्ध केले आहे. सामान्यतः रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर उड्डाणविषयक तांत्रिक माहिती देण्यासाठी केला जातो. मात्र, व्हायरल क्लिपमध्ये एक वैमानिक "म्याऊ... म्याऊ" असा आवाज काढताना ऐकू येतो, तर दुसरा वैमानिक त्याला प्रतिसाद म्हणून भुंकताना ऐकू येत आहे.
वैमानिकांचा हा पोरकटपणा पाहून ड्युटीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने त्यांना फटकारले. "तुम्ही व्यावसायिक वैमानिकांसारखे वागायला हवे," अशा शब्दांत त्याने वैमानिकांना ताकीद दिली. इतकेच नाही तर, हे वैमानिक वारंवार सांगूनही ऐकत नसल्याचे पाहून कंट्रोलरने त्यांना टोला लगावला की, "तुमच्या अशा वागण्यामुळेच तुम्ही अजूनही लहान विमाने उडवत आहात."
हा सर्व प्रकार 'गार्ड' फ्रिक्वेन्सीवर घडला, जी केवळ आपत्कालीन स्थितीसाठी असते. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, १०,००० फुटांपेक्षा कमी उंचीवर असताना वैमानिकांनी केवळ सुरक्षेशी संबंधित संवाद साधणे अनिवार्य असते. या काळात कोणत्याही अवांतर गप्पांना परवानगी नसते. सध्या FAA या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत असून दोषी वैमानिकांवर कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. अद्याप या वैमानिकांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.