us military strike syria targets islamic state group hideouts in operation hawkeye
वॉशिंग्टन: पुढारी ऑनलाईन
अमेरिकेने सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून, या कारवाईत इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. व्हेनेजुएलामधील कारवाईनंतर यंदाच्या वर्षातील अमेरिकन लष्कराची ही दुसरी मोठी लष्करी कारवाई आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हे हल्ले करण्यात आले आहेत.
अमेरिका आणि तिच्या सहयोगी सैन्यदलांनी सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले आहेत. व्हेनेजुएलानंतर यंदा ही अमेरिकेची दुसरी मोठी लष्करी कारवाई ठरते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबत माहिती देताना सांगितले की, या हल्ल्यांमध्ये दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.
हे हल्ले ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ अंतर्गत करण्यात आले असून, 13 डिसेंबर रोजी सीरियामध्ये अमेरिकन लष्करावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली आहे. सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी या हल्ल्यांना मंजुरी दिली होती.
निवेदनात सांगण्यात आले की, दहशतवादाविरुद्ध लढा देणे आणि या भागातील अमेरिकन व सहयोगी सैन्यदलांचे संरक्षण करणे हा या कारवाईचा उद्देश आहे.
13 डिसेंबर रोजी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी सीरियामध्ये अमेरिकन लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक अमेरिकन नागरिक दुभाषिया (कॉन्ट्रॅक्टर) अशा तीन जणांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकन सेंट्रल कमांडने X (ट्विटर) वर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आमचा संदेश स्पष्ट आहे,जर तुम्ही आमच्या सैनिकांना इजा केली, तर आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि जगात कुठेही असलात तरी ठार मारू. तुम्ही न्यायापासून कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी.”
जॉर्डननेही हल्ल्यात सहभाग घेतला
बीबीसीच्या अहवालानुसार, एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, अमेरिका आणि तिच्या सहयोगी सैन्यदलांनी या ऑपरेशनमध्ये 35 पेक्षा अधिक ठिकाणांवर 90 हून अधिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. या कारवाईत 20 पेक्षा जास्त विमानांनी सहभाग घेतला.
या हल्ल्यांमध्ये F-15E, A-10, AC-130J, MQ-9 (ड्रोन) तसेच जॉर्डनचे F-16 ही विमाने सहभागी होती. हल्ले नेमके कुठे झाले आणि त्यात किती दहशतवादी मारले गेले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी शनिवारी X वर या लष्करी कारवाईबाबत लिहिताना म्हटले, “आम्ही कधीही विसरणार नाही आणि कधीही माघार घेणार नाही.”
डिसेंबर महिन्यात ट्रम्प प्रशासनाने ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ची घोषणा केली होती. त्यावेळी सीरियातील पालमायरा येथे इस्लामिक स्टेटच्या एका बंदूकधाऱ्याने दबा धरून हल्ला करत दोन अमेरिकन सैनिक आणि एका अमेरिकन नागरिक दुभाषिया कॉन्ट्रॅक्टरची हत्या केली होती.