us imposes 5 conditions on iran
वॉशिंग्टन :अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धबंदी असली, तरी हा संघर्ष पूर्णपणे कधी संपणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. आता अमेरिकेकडून इराणवर पुन्हा एकदा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणसमोर पाच मोठ्या अटी ठेवल्या आहेत.
इराणच्या 'फार्स न्यूज एजन्सी'नुसार, अमेरिकेने पूर्वी लादलेले निर्बंध आणि धोरणात्मक निर्णयांमुळे इराणचे जे नुकसान झाले, त्यासाठी कोणतीही भरपाई देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या या अटींनंतर आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खोमेनी काय पाऊल उचलणार? ते या अटी मान्य करणार की मध्य पूर्वेतील (मिडल ईस्ट) तणाव आणखी वाढणार का, याकडेही संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
युद्धातील नुकसानीसाठी इराणला कोणतीही भरपाई देण्यास अमेरिकेचा नकार.
इराणकडून 400 किलो समृद्ध युरेनियम देण्यात यावे.
इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या वापरावर मर्यादा आणणे (केवळ एकच संच सुरू ठेवणे).
परदेशात गोठवलेली इराणची २५ टक्के संपत्ती जारी करण्यास नकार देणे.
लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबवणे हे केवळ चर्चेवर अवलंबून ठेवणे.
इराणच्या 'फार्स न्यूज'ने सूत्रांचा हवाला देत सांगितले की, इराणनेही अमेरिकेसोबतच्या चर्चेसाठी आपल्या अटी मांडल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने लेबनॉन आणि इराणशी संबंधित युद्धे थांबवणे, इराणवरील निर्बंध हटवणे, गोठवलेली इराणी संपत्ती मुक्त करणे, युद्धातील नुकसानीची भरपाई मिळणे आणि 'हॉर्मुज सामुद्रधुनी'वरील (Strait of Hormuz) इराणच्या अधिकाराला अमेरिकेने मान्यता देणे, या अटींचा समावेश होता.
अमेरिका आणि इराणमध्ये ७ एप्रिल रोजी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या अमेरिका-इस्त्रायली हल्ल्यानंतर या भागात अनेक आठवडे तणाव वाढला होता, त्यानंतर ही युद्धबंदी झाली. या दोन्ही देशांमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान सध्या मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. परंतु, अमेरिका आणि इराणमधील संवादादरम्यान पाकिस्तानच्या भूमिकेवर, त्याच्या निःपक्षपातीपणावर आणि अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाकिस्तान एकीकडे शांततादूत म्हणून अमेरिकेसोबत राजनैतिक हातमिळवणी करत असतानाच, दुसरीकडे इराणची लष्करी विमाने पाकिस्तानच्या भूमीवर उतरत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या विमानांना अमेरिकेची पाळत आणि हवाई हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यात आले होते. या दाव्यांमुळे पाकिस्तानने अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेल्या आपल्या 'निःपक्षपाती' प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.