प्रातिनिधिक छायाचित्र.  
आंतरराष्ट्रीय

Crude oil prices drop | दिलासादायक..! अमेरिका-इराण शांतता कराराचे 'संकेत', कच्च्या तेलाचे दर २ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर

'हॉर्मुझची सामुद्रधुनी' नाकेबंदीमुळे मध्य पूर्वेतून होणारा खनिज तेलाचा पुरवठा अजूनही मर्यादितच

पुढारी वृत्तसेवा

crude oil prices drop

सिंगापूर : अमेरिका आणि इराण शांतता कराराचे संकेत मिळत आहेत. याचे सकारात्‍मक परिणाम आज (दि. २५) तेल बाजारावर दिसले. कच्च्या तेलाच्या किमती दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये अजूनही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून मतभेद आहेत, 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) रोखण्याच्या मुद्द्याचा समावेश आहे. या नाकेबंदीमुळे मध्य पूर्वेतून होणारा खनिज तेलाचा पुरवठा अजूनही मर्यादित आहे.

७ मे नंतर प्रथमच कच्च्या तेलाचे दर २ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर

'रॉयटर्स'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असून, दर गेल्या दोन आठवड्यांतील सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड' तेलाची किंमत सुमारे ४.५ टक्क्यांनी घसरून ९८.८३ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. तर अमेरिकेचे 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' (WTI) तेलही जवळपास पाऊणे पाच टक्क्यांनी स्वस्त होऊन ९२.०३ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. ७ मे नंतर तेलाचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प यांनी दिले शांततेचे संकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (दि. २३ मे) म्‍हटलं होतं की, वॉशिंग्टन आणि इराण यांच्यात शांतता कराराच्या सामंजस्य करारावर (MoU) मोठ्या प्रमाणावर वाटाघाटी" झाल्या आहेत. या करारामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल. ट्रम्प यांनी रविवारी स्पष्ट केले की, त्यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणत्याही करारासाठी घाई न करण्यास सांगितले आहे.

कच्च्या तेलाच्‍या दराबाबत तज्ज्ञ काय म्‍हणतात?

'एमएसटी मार्की'चे विश्लेषक सॉल काव्होनिक यांनी म्‍हटलं आहे की, इराण आणि अमेरिका यांच्‍यातील शांतता करार आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अजूनही अनेक धोके आणि अटी आहेत. तरी शांतता कराराबाबत सकारात्‍मक संकेत मिळत आहेत. यामुळे नजीकच्या काळात तेलाच्या किमतींमधून काहीसा दिलासा मिळेल. मात्र, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आणि या संघर्षात नुकसान झालेल्या तेल व वायू प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT