आंतरराष्ट्रीय

US Iran conflict | अमेरिकेचा मोठा प्लॅन? इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशनची तयारी, 'होर्मुझ'सह खार्ग बेटावरही डोळा

US Iran conflict | व्यापारी आणि लष्करी जहाजांना लक्ष्य करू शकणारी इराणची शस्त्रे नष्ट करण्यासाठी किनारी भागांत करणार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

अमेरिका इराणमध्‍ये राबविणार असलेल्या विशेष मोहिमेमध्ये पायदळाचा समावेश असू शकतो. मात्र, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यापैकी कोणत्याही योजनेला मंजुरी देतील का, हे अद्याप अस्पष्ट असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

US Iran conflict

वॉशिंग्‍टन : मध्य पूर्वेतील युद्ध सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. आता अमेरिका इराणमध्ये अनेक आठवडे चालणाऱ्या जमिनीवरील मोहिमांची तयारी करत आहे. यामध्ये खार्ग बेट आणि होर्मुझ सामुद्रधुनीजवळील किनारी भागांवर छाप्यांचा समावेश आहे, असे वृत्त 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिले आहे.

खार्ग बेटावर ताबा मिळवण्याचा विचार

अमेरिका राबविणार असलेल्या विशेष मोहिमेमध्ये पायदळाचा समावेश असू शकतो. मात्र, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यापैकी कोणत्याही योजनेला मंजुरी देतील का, हे अद्याप अस्पष्ट असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या मोहिमा पूर्ण स्वरूपाचे आक्रमण नसतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. इराणचे सर्वात मोठे तेल टर्मिनल असलेल्या खार्ग बेटावर ताबा मिळवण्याबाबत ट्रम्प प्रशासन चर्चा करत असल्याचे 'वॉशिंग्टन पोस्ट'ने म्हटले आहे. गेल्या महिन्यापासून तेहरानने होर्मुझ सामुद्रधुनी प्रभावीपणे रोखली आहे. त्यामुळे व्यापारी आणि लष्करी जहाजांना लक्ष्य करू शकणारी इराणची शस्त्रे शोधून नष्ट करण्यासाठी या किनारी भागांत छापे टाकले जाऊ शकतात. या मोहिमेच्या कालावधीबाबत मतमतांतरे आहेत. अमेरिकन लष्कराच्या या योजना अत्यंत व्यापक असल्याचे एका माजी संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले.

'ही आयत्या वेळची तयारी नाही'

"आम्ही याचा सखोल अभ्यास केला आहे. यावर युद्धसराव झाले आहेत. हे काही शेवटच्या क्षणी केलेले नियोजन नाही," असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. इराणी भूभागावर ताबा मिळवल्यास इस्लामिक रिपब्लिकची राजवट अडचणीत येईल आणि भविष्यातील वाटाघाटींमध्ये अमेरिकेच्या हाती "महत्त्वाचे कार्ड" येईल, असा दावाही त्यांनी केला. मात्र, ताब्यात घेतलेल्या भागातील अमेरिकन सैनिकांचे संरक्षण करणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. खार्ग बेटावरील सैनिकांना सुरक्षा पुरवणे हे कठीण काम आहे. त्यावर ताबा मिळवणे कठीण नाही, पण तिथे गेल्यावर आपल्या माणसांचे रक्षण करणे आव्हानात्मक आहे," असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नुसती धमकी देत नाहीत : कॅरोलिन लेविट

इराणच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी ९० टक्के निर्यात खार्ग बेटावरून होते. ट्रम्प यांनी या बेटाचे वर्णन इराणसाठीचा "मुकुटमणी" असे केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला वारंवार इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी मागील आठवड्यात म्हटलं होतं की, इराणने युद्धविरामासाठी करार मान्य केला नाही, तर अध्यक्ष ट्रम्प त्यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यास तयार आहेत. अध्यक्ष ट्रम्प नुसती धमकी देत नाहीत. इराणने पुन्हा चुकीचे पाऊल टाकू नये." मात्र, या लष्करी योजनांचा अर्थ असा नाही की अध्यक्षांनी अंतिम निर्णय घेतला आहे.

२० वर्षांतील सर्वात मोठी लष्करी जमवाजमव

शनिवारी अमेरिकेने जाहीर केले की, ३,५०० मरीन आणि नौसैनिक मध्य पूर्वेमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील या प्रदेशातील ही सर्वात मोठी अमेरिकन फौज आहे. हे सैनिक 'यूएसएस त्रिपोली' या युद्धनौकेवरून आले आहेत. यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि स्ट्राईक फायटर विमाने, ओस्प्रे विमाने आणि एफ-३५ फायटर जेट्सचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT