US-Iran War file photo
आंतरराष्ट्रीय

US-Iran War: अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम: ट्रम्प दोन आठवडे हल्ले थांबवण्यास तयार, इस्रायलचीही संमती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दर्शवल्याची घोषणा केली आहे.

मोहन कारंडे

US-Iran War

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दर्शवल्याची घोषणा केली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडावी अन्यथा नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करू, अशी शेवटची धमकी दिल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यांनी ही घोषणा केली. इराणने हा युद्धविराम स्वीकारला आहे.

ट्रम्प यांची 'सोशल मीडिया'वरून घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. "मी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवरील सर्व प्रकारचे हल्ले स्थगित करण्यास तयार आहे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ही शस्त्रसंधी दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दोन आठवड्यांच्या काळात दोन्ही बाजूंकडून कोणत्याही प्रकारची चिथावणीखोर कारवाई केली जाणार नाही.

पाकिस्तानची मध्यस्थी

हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी झालेली चर्चा निर्णायक ठरल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानने अमेरिकेला हल्ले टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, ट्रम्प यांनी इराणसमोर एक महत्त्वाची अट ठेवली आहे. तणाव कमी करण्यासाठी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करावी लागणार आहे.

इराणकडून १० कलमी प्रस्ताव

ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने आपले लष्करी उद्दिष्ट पूर्ण केले असून आता तेहरानसोबतची चर्चा निर्णायक टप्प्यावर आहे. वॉशिंग्टनला इराणकडून १० कलमी शांतता प्रस्ताव प्राप्त झाला असून, तो चर्चेसाठी एक व्यवहार्य आधार असल्याचे ट्रम्प यांनी मानले आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांत प्राथमिक सहमती झाली असून, या १५ दिवसांच्या काळात कराराला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.

इराणच्या १० कलमी प्रस्तावातील प्रमुख मागण्या

१. इराणवर भविष्यात पुन्हा कधीही हल्ला केला जाणार नाही, याची लेखी आणि ठोस हमी द्यावी.

२. युद्धविराम नव्हे, कायमस्वरूपी शेवट: केवळ तात्पुरता युद्धविराम इराणला मान्य नाही; तर युद्धाचा कायमस्वरूपी अंत झाला पाहिजे.

३. इस्रायलने लेबनॉनमध्ये सुरू केलेले सर्व हवाई आणि लष्करी हल्ले त्वरित थांबवावेत.

४. अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व आर्थिक आणि व्यापारी निर्बंध पूर्णपणे उठवावेत.

५. मध्यपूर्वेतील इराणच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध (उदा. हुथी, हिजबुल्ला) सुरू असलेले सर्व लष्करी कारवाया थांबवण्यात याव्यात.

६. वरील मागण्या मान्य झाल्यास इराण जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली करेल.

७. या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर इराण २० लाख डॉलर्स (अंदाजे १७ कोटी रुपये) इतका 'हॉर्मुझ शुल्क' आकारेल.

८. या शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा शेजारील ओमान देशालाही दिला जाईल.

९. या जलमार्गातून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी इराण स्वतःची नियमावली तयार करेल.

१०. जहाजांकडून मिळालेल्या शुल्काचा वापर इराण युद्धात झालेल्या नुकसानीच्या भरपाईऐवजी देशाच्या पुनर्बांधणीसाठी करेल.

अमेरिकेची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा हा प्रस्ताव एक 'महत्त्वाचे पाऊल' असल्याचे म्हटले आहे, परंतु हे पुरेसे नाही असेही स्पष्ट केले. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनीवर शुल्क आकारण्याच्या इराणच्या मागणीला अमेरिकेने विरोध दर्शवला असून, तो मार्ग आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी विनामूल्य असावा अशी अमेरिकेची भूमिका आहे. या प्रस्तावावर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चर्चा होते आणि मध्यपूर्वेतील युद्ध थांबते का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

युद्धाचे ढग सरले, जगाला मोठा दिलासा

ट्रम्प यांनी इराणला दिलेली मुदत संपण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटे आधी ही घोषणा केली. काल रात्रीच ट्रम्प यांनी इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती, ज्याचा अर्थ अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा असा काढला जात होता. या विधानावर जगभरातून आणि अमेरिकेतूनही टीका झाली होती. मात्र, आता अचानक बदललेल्या या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे. आता सर्वांचे लक्ष पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT