US Iran conflict file photo
आंतरराष्ट्रीय

US Iran conflict: पुन्हा बिनसलं? अमेरिका आणि इराणचे एकमेकांवर हल्ले; जगाची चिंता वाढली!

ओमानच्या समुद्रात एका व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे.

पुढारी वृत्तसेवा

US Iran conflict

वॉशिंग्टन/तेहरान: ओमानच्या समुद्रात एका व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. अमेरिकेने शुक्रवारी थेट इराणच्या हद्दीत घुसून क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांवर भीषण हवाई हल्ले केले. स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांत झालेल्या ऐतिहासिक शांतता कराराला हरताळ फासत अमेरिकेने ही थेट लष्करी कारवाई केली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या या कारवाईनंतर संतप्त झालेल्या इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'नेही अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या ताज्या घडामोडींमुळे जागतिक पातळीवर पुन्हा तणाव वाढला आहे.

'हल्ल्याचे चोख उत्तर मिळेल'; ट्रम्प यांचा आधीच इशारा

अमेरिकेने ही लष्करी कारवाई करण्याच्या काही मिनिटे आधीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले होते. इराणच्या कृत्याला अमेरिका प्रत्युत्तर देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ट्रम्प यांनी अत्यंत सूचक शब्दांत, "तुम्हाला लवकरच समजेल," असे म्हटले होते. त्यानंतर अवघ्या काही वेळातच अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने इराणमधील लष्करी तळांवर अचूक हल्ले केल्याची अधिकृत घोषणा केली.

जहाजावरील हल्ल्याचा घेतला बदला

'सेंट्रल कमांड'ने दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी इराणने 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'त सिंगापूरचा ध्वज असलेल्या 'एम/व्ही एव्हर लव्हली' या मालवाहू जहाजावर 'वन-वे' सुसाईड ड्रोनद्वारे हल्ला केला होता. हे जहाज ओमानच्या किनारपट्टीवरून जात असताना हा हल्ला झाला. याचाच बदला म्हणून अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणमधील ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठवणूक केंद्रे तसेच किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर बॉम्बवर्षाव केला. या कारवाईनंतर इराणच्या सीरीक या दक्षिण बंदर शहरात मोठे स्फोट झाले.

"हा आमच्यावरील अन्यायकारक हल्ला असून इराणने या कृत्याद्वारे स्पष्टपणे शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले आहे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील शांतता भंग करण्याचा इराणचा हा प्रयत्न अमेरिका खपवून घेणार नाही."
— यूएस सेंट्रल कमांड

'हिंसेचे उत्तर हिंसेनेच मिळेल' : जे. डी. व्हान्स

या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी 'X' वरून इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. व्हान्स म्हणाले, "इराणने स्वतः शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे आणि आम्ही त्याचे पालन केले. जर त्यांना कराराच्या अटींबद्दल काही आक्षेप होते, तर ते फोनवर बोलू शकत होते. पण त्यांनी हिंसेचा मार्ग निवडला, तर आता हिंसेचे उत्तर हिंसेनेच दिले जाईल."

जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण

अमेरिका आणि इराणमधील या ताज्या संघर्षामुळे 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा एकदा जागतिक पटलावर केंद्रस्थानी आली आहे. हा सागरी मार्ग अत्यंत संवेदनशील मानला जातो, कारण जगातील एकूण खनिज तेल आणि लिक्विफाइड नॅचरल गॅसच्या पुरवठ्यापैकी तब्बल २० टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. त्यामुळे या भागात संघर्ष वाढल्यास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इंधनाच्या दरांवर याचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT