AI image
आंतरराष्ट्रीय

चीनसाठी हेरगिरीचा संशय; 'एनव्हिडिया'च्या प्रमुखांसोबत चिनी महिलेची विशेष जवळीक

ट्रम्प यांना वर्षभरापूर्वीच माहिती; मात्र कारवाई नाही : 'द न्यूयॉर्क टाईम्स'च्या वृत्ताने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Nvidia CEO Jensen Huang Targeted In Chinese Spy Plot Report

वॉशिंग्टन डी सी: अनिल टाकळकर

सिंगापूरस्थित मेगास्पीड या डेटा सेंटर कंपनीतील वरिष्ठ महिला अधिकारी अॅलिस हुआंग ऊर्फ हुआंग ले चीनसाठी गुप्त माहिती गोळा करून बीजिंगला पुरवत असल्याचा निष्कर्ष अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी काढल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, जगातील आघाडीची एआय चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांच्याशी तिचे जवळचे संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

'द न्यूयॉर्क टाईम्स'च्या वृत्तानुसार अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या गुप्तचर माहितीची सुमारे वर्षभरापूर्वी माहिती देण्यात आली होती. मात्र, एनव्हिडियाच्या चिपविक्रीवर परिणाम होऊ नये आणि चीनशी व्यापारसंबंध बिघडू नयेत, यासाठी त्यांनी कारवाई टाळल्याचे वृत्तात म्हटले आहे. या दाव्यांवर अमेरिकी सरकारने अधिकृत भाष्य केलेले नाही.

चीनला चिप्स पुरविण्याचा संशय

मेगास्पीड चीनला अत्याधुनिक एआय चिप्स मिळविण्यासाठी निर्यात निर्बंध टाळण्यात मदत करत असल्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांना संशय आहे. कंपनी एनव्हिडियाच्या चिप्स खरेदी करून दक्षिण पूर्व आशियात डेटा सेंटर उभारते आणि त्यांची संगणकीय क्षमता चीनमधील अलीबाबासारख्या कंपन्यांना पुरवते. काही चिप्स बेकायदेशीररीत्या चीनमध्ये पोहोचत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. व्यापारविषयक नोंदींनुसार, मेगास्पीडच्या मलेशियातील सहयोगी कंपनीने जून २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या काळात एनव्हिडियाच्या चिप्स आणि तंत्रज्ञानाचा समावेश असलेली किमान ४.८ अब्ज डॉलरची उपकरणे खरेदी केली.

एनव्हिडिया व ट्रम्प यांचे जवळचे संबंध

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जेन्सेन हुआंग यांनी चीनला एनव्हिडियाच्या चिप्स विकण्यावरील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाठपुरावा केला. ट्रम्प यांनी काही आधीच्या श्रेणीतील चिप्स चीनला विकण्यास परवानगी दिली होती. त्याबदल्यात अमेरिकी सरकारला विक्रीच्या उत्पन्नातील २५ टक्के हिस्सा मिळणार होता. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, ट्रम्प आणि जेन्सेन हुआंग यांच्यातील जवळच्या संबंधांमुळे एनव्हिडियाच्या चिपविक्रीवरील निर्बंध कठोर करण्याचे काही प्रयत्न रखडले. मात्र, एनव्हिडियाने कायद्याचे पालन करत असल्याचे आणि चिप्सची चीनमध्ये तस्करी झाल्याचा पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आरोपांना नकार; अनेक प्रश्न अनुत्तरित

मेगास्पीडने आरोपांची गंभीर दखल घेत स्वतंत्र चौकशी सुरू केली असून अमेरिकी सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. चीनच्या दूतावासाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. एनव्हिडियानेही आपली भूमिका स्पष्ट करत ग्राहकांना केवळ सामान्य व्यावसायिक माहिती दिली जात असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT