US fighter jet crash US fighter jet
आंतरराष्ट्रीय

US fighter jet crash: एअर शोदरम्यान २ लढाऊ विमानांची धडक; हवेतच तुकडे-तुकडे झाले, कसा वाचवला ४ वैमानिकांनी जीव? पाहा Video

अमेरिकेतील आयडाहो येथील 'माउंटन होम एअर फोर्स बेस'वर सुरू असलेल्या 'गनफायटर स्काइज एअर शो' दरम्यान रविवारी एक मोठी दुर्घटना घडली.

मोहन कारंडे

US fighter jet crash

वॉशिंग्टन: अमेरिकेतील आयडाहो येथील 'माउंटन होम एअर फोर्स बेस'वर सुरू असलेल्या 'गनफायटर स्काइज एअर शो' दरम्यान रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. दोन अमेरिकन लढाऊ विमानांची हवेतच एकमेकांशी भीषण धडक झाली. सुदैवाने, या विमानांमधील चारही वैमानिक वेळेत पॅराशूटच्या साहाय्याने सुखरूप बाहेर पडले. या अपघातानंतर एअर फोर्स बेस तात्काळ बंद करण्यात आला असून, शोचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हवेतच विमानांचे तुकडे, थरार कॅमेऱ्यात कैद

रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास ही घटना घडली. अमेरिकन नौदलाची दोन 'EA-18G ग्रोलर' ही लढाऊ विमाने एअर शोमध्ये कसरती सादर करत असताना हवेतच एकमेकांवर आदळली. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन्ही विमानांची धडक झाल्यानंतर त्यांचे तुकडे झाले आणि काही क्षणांतच चार पॅराशूट जमिनीच्या दिशेने येताना दिसत आहेत. हा अपघात एअर बेसपासून साधारण दोन मैल अंतरावर झाला. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट हवेत उसळताना दिसले. एअर शोमधील अधिकाऱ्याने चारही वैमानिक सुरक्षितपणे असल्याची घोषणा करताच उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. माउंटन होम एअर फोर्स बेसच्या प्रवक्त्यांनी 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेला सांगितले की, "बचाव पथके घटनास्थळी तैनात असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. अधिक माहिती हाती येताच ती जाहीर केली जाईल." या अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने रविवारी होणारे इतर सर्व कार्यक्रम रद्द केले होते.

८ वर्षांनंतर आयोजित शोमध्ये विघ्न

विशेष म्हणजे, तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर रविवारी 'गनफायटर स्काइज एअर शो'चे आयोजन करण्यात आले होते. लष्करी विमानांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी हजारो नागरिक येथे जमले होते. या शोच्या तयारीसाठी आयोजकांनी गेली दोन वर्षे मेहनत घेतली होती, मात्र या दुर्दैवी घटनेमुळे शोचा थरार थांबवावा लागला.

जुन्या आठवणी ताज्या

या अपघातामुळे माउंटन होम एअर शोच्या इतिहासातील जुन्या अपघातांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

२०१८: एअर शोदरम्यान एका हँग ग्लायडर पायलटचा धावपट्टीवर कोसळून मृत्यू झाला होता.

२००३: येथेच 'थंडरबर्ड्स'चे एक लढाऊ विमान कोसळले होते, ज्यामध्ये वैमानिकाने दुर्घटना होण्याच्या काही सेकंद आधी बाहेर पडून स्वतःचे प्राण वाचवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT