US DIA Worldwide Threat Assessment Report
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) ने 2025 साठी सादर केलेल्या जागतिक धोका मूल्यांकन (Worldwide Threat Assessment) अहवालात भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आणि भारताच्या लष्करी व संरक्षण धोरणांबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.
अहवालानुसार, पाकिस्तान भारताकडे "अस्तित्वाचा धोका" (Existential Threat) म्हणून पाहतो, त्यामुळे आपल्या पारंपरिक लष्करी कमतरतेला भरून काढण्यासाठी पाकिस्ताना "बॅटलफील्ड न्युक्लियर वेपन्स" विकसित करत आहे.
तर पाकिस्तान भारतासाठी दुय्यम (Ancillary Security Problem) असून चीनच भारताचा मुख्य खरा शत्रू (Primary Adversary) असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानसाठी भारत सर्वात मोठा धोका असल्याने तो सतत अण्वस्त्रशक्ती आणि सैनिकीकरण वाढवत आहे.
अहवालात 7 ते 10 मेदरम्यान भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या क्षेपणास्त्र, ड्रोन आणि तोफांमधून झालेल्या जोरदार कारवाईचा उल्लेख आहे.
ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल अखेरीस झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे घडली.
अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताचे संरक्षण धोरण पुढील मुद्द्यांवर केंद्रित आहे:
जागतिक नेतृत्व प्रदर्शित करणे
चीनला सामोरे जाणे
संरक्षण क्षेत्रात "मेक इन इंडिया" अंतर्गत आत्मनिर्भरता
भारतीय महासागर क्षेत्रातील द्विपक्षीय संरक्षण भागीदारी वाढवणे
भारताने 2024 मध्ये अण्वस्त्र सक्षम Agni-I Prime आणि Agni-V MIRV क्षेपणास्त्रांची चाचणी केली. याशिवाय भारताने आपली दुसरी अण्वस्त्र-सक्षम पाणबुडी सेवा मध्ये घेतली आहे. यामुळे भारताचे त्रिसंधान (nuclear triad) अधिक बळकट झाले आहे.
भारताने रशियासोबतचे संबंध कायम ठेवले असून, संरक्षण आणि आर्थिक गरजांसाठी ते महत्त्वाचे आहेत. रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रांवरील भारताचे अवलंबित्व अजूनही खूप मोठे आहे, जरी नवीन खरेदीमध्ये घट झाली असली तरी.
चीनबरोबरच्या सीमावादावर बोलताना अहवालात नमूद आहे की, 2024 मधील लडाख सीमेवरील सैन्य माघारी ही तणाव कमी करणारी होती, मात्र सीमारेषेवरील वाद कायम आहे.
पाकिस्तान भारताला स्वतःच्या अस्तित्वासाठी धोका मानत असल्यामुळे आपल्या पारंपरिक लष्करी कमतरतेला भरून काढण्यासाठी तो "बॅटलफील्ड न्युक्लियर वेपन्स" विकसित करत आहे.
त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी लागणारी तांत्रिक व आर्थिक मदत प्रामुख्याने चीनकडून मिळते, तसेच हाँगकाँग, सिंगापूर, तुर्कस्तान आणि युएईमधून सामुग्री पुरवठा होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
2024 मध्ये पाकिस्तानमध्ये 2500 हून अधिक नागरिक आणि सुरक्षारक्षक दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडले. विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि बलुच राष्ट्रवादी गटांनी मोठे हल्ले केले.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी नागरिकांवरही हल्ले वाढले असून 2024 मध्ये सात चिनी नागरिक मारले गेले, हे दोन्ही देशांमधील वादग्रस्त मुद्दे ठरत आहेत.
इराण: जानेवारी 2024 मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर दोन्ही देशांनी उच्चस्तरीय बैठका घेऊन तणाव निवळवण्याचा प्रयत्न केला.
अफगाणिस्तान: मार्च 2025 मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान हवाई आणि तोफगोळ्यांचे हल्ले झाले, दोन्ही देशांनी एकमेकांवरील दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केल्याचा दावा केला.