US Strikes Iran file photo
आंतरराष्ट्रीय

US strikes Iran: अमेरिकेचा इराणमधील ८० ठिकाणांवर भीषण बॉम्बहल्ला; संरक्षण यंत्रणा, रडार आणि क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकन लष्कराने इराणच्या ८० हून अधिक लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

US strikes Iran

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकन लष्कराने इराणच्या ८० हून अधिक लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने म्हटले आहे. या हल्ल्यांनंतर आता इराणनेही अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स (नियंत्रण कक्ष), किनारपट्टीवरील रडार स्टेशन्स, जहाज-विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा (लाँचर्स), ड्रोन हल्ल्यांची ठिकाणे (लाँच साइट्स) आणि 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'च्या ६० हून अधिक वेगवान बोटींना लक्ष्य करण्यात आले. याशिवाय, बंदर अब्बास, केशम बेट आणि सिरिक जवळील अनेक लष्करी तळांवरही बॉम्बफेक करण्यात आली.

अमेरिकेने स्पष्ट केले की, या हल्ल्यांच्या काही तास आधी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले होते. यामध्ये मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले 'एम/टी अल-रकिया', सौदी अरेबियाचे 'एम/टी वेदायण' आणि लायबेरियाचे 'एम/टी सायप्रस प्रॉस्पेरिटी' या जहाजांचा समावेश होता. अमेरिकेने या हल्ल्यांसाठी इराणला थेट जबाबदार धरले असून, हे हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय युद्धविराम कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेने इराणमध्ये कुठे कुठे हल्ले केले?

ब्रिटनच्या सागरी सुरक्षा संस्थेनुसार, हे सर्व हल्ले ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या किनारपट्टीजवळ झाले. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी बंदर अब्बास, केशम आणि सिरिक येथे मोठ्या स्फोटांचे आवाज आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणचे उप-परराष्ट्र मंत्री काझम घरीबाबादी यांनी अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, याला शांतता कराराचे उल्लंघन म्हटले आहे. तसेच, या कारवाईच्या परिणामांची पूर्ण जबाबदारी अमेरिकेची असेल, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या युद्धाच्या घडामोडी सुरू असतानाच, दुसरीकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रियाही सुरू आहे. त्यांचे पार्थिव तेहरानहून कोम आणि त्यानंतर इराकमधील नजफ येथे नेण्यात आले, जिथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. इराण आणि इराक या दोन्ही देशांतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. यावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, अयातुल्ला यांचे पुत्र मुस्तफा खामेनी, गुलामअली हद्दाद-आदिल आणि सल्लागार मोहसेन रेझाई उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT