US Iran War 2026
तेहरान: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील 'होर्मुझची सामुद्रधुनी' परिसरातील क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करत मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात अमेरिकेने २,२०० किलो वजनाच्या अत्यंत शक्तिशाली 'बंकर बस्टर' बॉम्बचा वर्षाव केला आहे.
यूएस सेंट्रल कमांडने बुधवारी पहाटे दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणच्या किनारपट्टीवरील बळकट क्षेपणास्त्र तळांवर अनेक 'डीप पेनिट्रेटर' बॉम्ब डागले. इराणची ही जहाजाविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांसाठी मोठा धोका निर्माण करत होती, असा दावा अमेरिकेने केला आहे.
या हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'नाटो' मित्रदेशांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी लष्करी मदत देण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले होते, जे बहुतेक मित्रदेशांनी फेटाळून लावले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत फ्रान्स आपले नौदल तिथे पाठवणार नाही. यावर ट्रम्प यांनी 'नाटो'वर टीका करताना म्हटले, "नाटोची ही मोठी चूक आहे. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही, आम्ही एकटे लढण्यास सक्षम आहोत."
मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी व्यावहारिकदृष्ट्या बंद झाली आहे. जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते.