Ukraine robot war x photo
आंतरराष्ट्रीय

Ukraine robot war: मानवी सैनिकांची गरज संपतेय? युक्रेनचे 'सायलेंट डेथ' रोबोट्स रशियाविरुद्ध कसे लढतायत?

युक्रेनने सैनिकांची कमतरता आणि दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे रोबोट, ड्रोन आणि दूरस्थ नियंत्रणावर चालणाऱ्या यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे.

मोहन कारंडे

Ukraine robot war

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाचे चौथे वर्ष सुरू होत असताना रणांगणावर मोठा बदल दिसून येत आहे. २०२२ मध्ये रणगाडे, तोफखाना आणि पायदळ सैनिकांवर अवलंबून असलेले हे युद्ध आता वेगाने यंत्राधारित संघर्षात रूपांतरित होत आहे. युक्रेनने सैनिकांची कमतरता आणि दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे रोबोट, ड्रोन आणि दूरस्थ नियंत्रणावर चालणाऱ्या यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला असून, अनेक धोकादायक मोहिमा आता मानवी सैनिकांऐवजी यंत्रे पार पाडत आहेत.

आघाडीच्या लढाईत रोबोटांची एन्ट्री

वाढत्या सैनिक तुटवड्याचा आणि रशियाविरुद्धच्या दीर्घकाळ चाललेल्या चिवट युद्धाचा सामना करत असलेल्या युक्रेनने मानवरहित प्रणालींचा वापर वेगाने वाढवला आहे. स्फोटकांनी भरलेल्या जमिनीवरील रोबोट्स आणि ड्रोनच्या ताफ्यांचा वापर करून हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रणांगणापासून अनेक किलोमीटर दूर बसलेले ऑपरेटर हे रोबोट नियंत्रित करतात. हे रोबोट रशियन सैन्याच्या तळांपर्यंत पोहोचून स्फोट घडवून आणतात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या मते, २०२६ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांत मानवरहित प्रणालींनी २२ हजारांहून अधिक मोहिमा पूर्ण केल्या. तसेच, अलीकडेच युक्रेनने एकही सैनिक न पाठवता केवळ रोबोट आणि ड्रोनच्या मदतीने रशियाचे एक महत्त्वाचे ठिकाण ताब्यात घेतल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

'सायलेंट डेथ'ची रशियन सैनिकांमध्ये दहशत

युक्रेनची लोकसंख्या रशियाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे, तर अनेक वर्षांच्या युद्धामुळे सैनिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनच्या स्फोटक वाहून नेणाऱ्या या रोबोटांना 'सायलेंट डेथ' असे टोपणनाव दिले आहे. कारण हे रोबोट अनेकदा स्फोट होण्याच्या काही क्षणांपूर्वीच त्यांच्या लक्षात येतात. लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, पूर्वी हजारो सैनिकांची गरज असणाऱ्या काही मोहिमा आता काही मोजक्या रोबोटिक वाहनांच्या मदतीने पूर्ण केल्या जात आहेत.

युद्धाच्या नव्या युगाची सुरुवात

युक्रेन आता दारुगोळा, अन्न आणि पाणी पुरवण्यासाठी, जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि टेहळणीसाठी मानवरहित वाहनांचा वापर करत आहे. काही रोबोटिक यंत्रणांवर जड मशीनगन बसवण्यात आल्या असून त्या अनेक दिवस लपून राहून योग्य संधी मिळताच शत्रूंवर हल्ला करू शकतात. यामुळे युद्धात अभियंते, सॉफ्टवेअर तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे महत्त्वही आता पारंपरिक लढाऊ सैनिकांइतकेच वाढले आहे. रशियाच्या इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी हे तज्ज्ञ अत्याधुनिक संप्रेषण प्रणाली, नेव्हिगेशन सॉफ्टवेअर आणि अँटी-जॅमिंग तंत्रज्ञान विकसित करत आहेत.

तंत्रज्ञान विरुद्ध तंत्रज्ञान

रणांगण आता केवळ सैनिकांमधील संघर्ष न राहता तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत बदलले आहे. जीपीएस सिग्नलमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे अनेकदा ऑपरेटरना ड्रोनच्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंच्या आधारे किंवा पूर्वनियोजित मार्गांद्वारे रोबोट नियंत्रित करावे लागतात. लष्करी विश्लेषकांच्या मते, ड्रोन युद्धतंत्रात युक्रेनने सुरुवातीपासून केलेली गुंतवणूक रशियाच्या संख्यात्मक वर्चस्वाला मोठ्या प्रमाणात रोखण्यात यशस्वी ठरली असून रशियन सैन्याला मोठे नुकसानही सहन करावे लागले आहे.

मनुष्यबळाच्या टंचाईतून नवकल्पनांचा जन्म

युक्रेनमध्ये सैनिकांची कमतरता दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक सैनिक सततच्या ड्रोन हल्ल्यांच्या छायेत महिनोनमहिने तैनात असतात. काही सैनिकांना जवळपास वर्षभर रणांगणावर राहावे लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मानवी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि रशियावरील दबाव कायम ठेवण्यासाठी युक्रेनने रोबोटिक युद्धतंत्राचा अवलंब केला आहे. युक्रेनने रोबोटच्या मदतीने पार पडलेल्या १६४ मोहिमांसाठी सुमारे २,३०० सैनिकांची आवश्यकता भासली असती आणि शेकडो जवानांचा जीव धोक्यात आला असता.

युद्धाचे भविष्य बदलणारी यंत्रे

अनेक माजी सैनिकांचे म्हणणे आहे की, हे तंत्रज्ञान युद्धाच्या सुरुवातीला उपलब्ध असते तर अनेक सहकाऱ्यांचे प्राण वाचले असते. आज जे रोबोट पूर्वी प्रयोगात्मक स्वरूपात वापरले जात होते, ते आता युद्धातील नियमित साधन बनले आहेत. पुरवठा करणे, स्फोटके पोहोचवणे, गोळीबार करणे आणि टेहळणी करणे यांसारखी कामे ते प्रभावीपणे पार पाडत आहेत. मानवी सैनिकांची भूमिका अद्याप महत्त्वाची असली तरी भविष्यातील युद्धांमध्ये विजयाचे समीकरण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून असेल, असे लष्करी तज्ज्ञांचे मत आहे. युक्रेनमधील संघर्षाने जगाला अशा भविष्याची झलक दाखवली आहे, जिथे यंत्रे केवळ सैनिकांना मदत करत नाहीत, तर रणांगणावरील सर्वाधिक धोकादायक जबाबदाऱ्या स्वतः सांभाळू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT