Russia-Ukraine war : युक्रेनमध्ये रशियाच्या बाजूने लढणाऱ्या एका भारतीय तरुणाला ताब्यात घेतले आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. माजोती साहिल मोहम्मद (वय २२) असे त्याचे नाव असून, तो गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी आहे. दरम्यान, भारताकडून युक्रेनच्या दाव्याच्या चौकशी सुरु आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेले नाही. दरम्यान, युक्रेनियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजोती साहिल मोहम्मद हा भारतीय तरुण रशियाला शिक्षणासाठी गेला होता परंतु ड्रग्जशी संबंधित प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
युक्रेनमधील 'द कीव इंडिपेंडेंट'च्या वृत्तानुसार, रशियन सैन्यासाठी लढणाऱ्या माजोती साहिल मोहम्मद (वय २२) या भारतीय तरुणाला युक्रेनच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. मेकॅनाइज्ड ब्रिगेडने ही कारवाई केली. व्हिडिओमध्ये, तो म्हणत आहे की, तो शिक्षणासाठी रशियाला गेला होता. येथे त्याला ड्रग्जशी संबंधित आरोपांवर सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तुरुंगात असताना पुढील शिक्षा टाळण्यासाठी त्याला रशियन सैन्यासोबत करार करण्याची संधी देण्यात आली. त्याने ही संधी स्वीकारली.
माजोती साहिल मोहम्मद व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "मला तुरुंगात राहायचे नव्हते, म्हणून मी 'विशेष लष्करी कारवाई' साठी करारावर स्वाक्षरी केली. त्याला रशियन सैन्याकडून १६ दिवसांचे प्रशिक्षण मिळाले. १ ऑक्टोबर रोजी त्याला त्याच्या पहिल्या लढाऊ मोहिमेवर पाठवण्यात आले. तीन दिवस तो या मोहित सहभागी होता. अखेर कमांडरशी झालेल्या संघर्षानंतर त्याने युक्रेनियन सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. आता मला रशियाला परत जायचे नाही. तिथे काहीही सत्य नाही, काहीही नाही. मी येथे (युक्रेनमध्ये) तुरुंगात जाण्यापेक्षा चांगले आहे."
भारतीय अधिकाऱ्यांनी या अटकेची पुष्टी केलेली नाही. आम्ही युक्रेनच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्ताची पडताळणी करत आहेत. वृत्तानुसार अटक करण्यता आलेल्या तरुणाचे नाव माजोती साहिल मोहम्मद हुसेन अशी आहे. तो गुजरातमधील मोरबीचा रहिवासी असल्याचा दावा करण्यात आला आहे. म्ही या वृत्ताची सत्यता पडताळत आहोत. आम्हाला अद्याप युक्रेनने या संदर्भात कोणताही औपचारिक संदेश मिळालेला नाही," असे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
रशियन सैन्य भारत आणि उत्तर कोरियासह इतर देशांतील नागरिकांना आकर्षक नोकऱ्या किंवा इतर संधी देण्याचे आश्वासन देऊन भरती करत आहे, असा दावा युक्रेनने यापूर्वी केला आहे. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की रशियामध्ये स्थायिक होण्यासाठी दिशाभूल केलेल्या एकूण १२६ पैकी १२ भारतीय नागरिक युक्रेनमध्ये रशियन सैन्यासाठी लढताना मृत्युमुखी पडले आहेत. तर अन्य सोळा जण बेपत्ता आहेत. यासंदर्भात भारत सरकारने रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना लवकर सोडण्याची विनंती केली होती.