US-Iran tensions file photo
आंतरराष्ट्रीय

US-Iran tensions: इराणला अद्दल घडवण्याचा अमेरिकेचा मोठा प्लॅन उघड; आधी एअर स्ट्राइक, तरीही न झुकल्यास थेट...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा अणू कार्यक्रम कायमचा मोडीत काढण्यासाठी एक थरकाप उडवणारी 'टू-फेज' लष्करी योजना आखली आहे.

मोहन कारंडे

US-Iran tensions:

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा अणू कार्यक्रम कायमचा मोडीत काढण्यासाठी एक थरकाप उडवणारी 'टू-फेज' लष्करी योजना आखली आहे. या योजनेनुसार, इराणने अणू कराराच्या अटी मान्य न केल्यास केवळ लष्करी कारवाईच नाही, तर तिथली सत्ता उलथवून टाकण्याचा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

पहिला टप्पा: मर्यादित हवाई हल्ले

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अमेरिका इराणच्या निवडक लष्करी तळांवर आणि सरकारी केंद्रांवर हवाई हल्ले करू शकते. ट्रम्प यांच्या मागण्या ही केवळ पोकळ धमकी नसून ती प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी आहे, असा थेट संदेश देहराानला देणे हा यामागचा उद्देश आहे. येत्या काही दिवसांतच हे हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ट्रम्प यांची इच्छा आहे की, इराणने आपला सर्व संवर्धित युरेनियमचा साठा देशाबाहेर हलवावा. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या साठ्यावर मर्यादा आणाव्यात. हिजबुल्ला आणि हुथी सारख्या दहशतवादी गटांना मिळणारा पाठिंबा तात्काळ बंद करावा.

दुसरा टप्पा: संपूर्ण लष्करी मोहीम आणि सत्तापालट

जर पहिल्या टप्प्यातील हल्ल्यानंतरही इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि तिथले प्रशासन झुकले नाही, तर ट्रम्प दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देतील. हा एक व्यापक लष्करी हल्ला असेल, ज्यामध्ये इराणची संपूर्ण लष्करी यंत्रणा आणि शासन केंद्रांना लक्ष्य केले जाईल. तज्ज्ञांच्या मते, १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सध्या इराणची राजवट सर्वात कमकुवत स्थितीत आहे आणि नेमकी हीच संधी साधून ट्रम्प तिथली सत्ता उलथवून लावण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेने मध्यपूर्वेत आपली लष्करी ताकद वाढवली आहे. १०० हून अधिक लढाऊ विमाने, डझनभर युद्धनौका, 'यूएसएस गेराल्ड फोर्ड' आणि 'यूएसएस अब्राहम लिंकन' या दोन महाकाय विमानवाहू युद्धनौका तैनात करण्यात आले आहेत. या भागातील अमेरिकन सैनिकांची संख्या सुमारे ४० हजार पर्यंत पोहोचू शकते. ही तयारी अनेक आठवडे चालणाऱ्या मोठ्या युद्धासाठी पुरेशी असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT