आंतरराष्ट्रीय

Donald Trump | 'होर्मुझ' तात्‍काळ उघडा, अन्यथा...' : ट्रम्प यांनी दिली इराणचे तेल आणि वीज नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची धमकी

Donald Trump warns Iran | लष्करी मोहीम संपवण्यासाठी अमेरिका एका नवीन आणि अधिक समंजस राजवटीशी गंभीर चर्चा करत आहे

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump warns Iran

वॉशिंग्टन : लवकरच कोणताही करार झाला नाही आणि 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) व्यापारासाठी पुन्हा उघडली नाही, तर इराणचे तेल विहिरी, वीज प्रकल्प आणि खार्ग बेट यांसारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या जातील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. एकीकडे इराणबरोबर कराराचे संकेत देत असतानाच, ट्रम्प यांनी अभूतपूर्व लष्करी कारवाईचा इशारा देऊन दबाव वाढवला आहे.

... तर आम्ही इराणमधील सर्व प्रकल्प उडवून देऊन संपवू

ट्रम्प यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म ट्रथवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इराणमधील आमची लष्करी मोहीम संपवण्यासाठी अमेरिका एका नवीन आणि अधिक समंजस राजवटीशी गंभीर चर्चा करत आहे. यात मोठी प्रगती झाली आहे; परंतु कोणत्याही कारणास्तव लवकरच करार झाला नाही (जो बहुधा होईलच) आणि जर होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी तातडीने खुली झाली नाही, तर आम्ही इराणमधील सर्व वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि खार्ग बेट (आणि सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प) उडवून देऊन संपवू."

...त्याचा हा सूड असेल

"आम्ही इराणमधील विविध प्रकल्पांना आतापर्यंत मुद्दाम हात लावलेला नाही. इराणच्या जुन्या राजवटीने गेल्या ४७ वर्षांच्या आपल्या 'दहशतीच्या राजवटीत' आमच्या अनेक सैनिकांची आणि इतरांची हत्या केली आहे, त्याचा हा सूड असेल," असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

युद्धात आतापर्यंत ३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

मध्यपूर्वेतील या संघर्षाला रविवारी (२९ मार्च) ३० दिवस पूर्ण झाले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर या युद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणनेही याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल आणि शेजारील आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने नियंत्रण मिळवल्यामुळे जागतिक बाजारपेठ हादरली आहे. जगातील एकूण तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार याच जलमार्गावरून होतो. 'एपी'च्या अहवालानुसार, आता इराण समर्थित हुथी बंडखोरही या युद्धात उतरल्यामुळे लाल समुद्रातील 'बाब अल-मंदेब' या दुसऱ्या महत्त्वाच्या जलमार्गावरील वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT