पुढारी ऑनलाईन डेस्कः अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने आपल्या धोरणात मोठा बदल करत, ट्रम्प प्रशासनाला लक्ष्य करण्याऐवजी थेट अमेरिकन जनतेला उद्देशून संदेश देण्यास सुरुवात केली आहे.
चीनने अमेरिकन नागरिकांसाठी दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या आयात करांच्या धोरणांचा फटका परदेशी अर्थव्यवस्थांना नाही तर अमेरिकन नागरिकांनाच बसतो आहे, असा दावा केला आहे. (China to American Citizen on trump tariffs)
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अमेरिकन आयातदार असल्याचे दाखवलेले व्यक्ती अमेरिकन जनतेला विशेषतः ट्रम्प समर्थकांना उद्देशून म्हणतो की, ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारधोरणांचा सर्वात मोठा आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडणार आहे. या धोरणांमुळे आयात वस्तू महाग होतील आणि ग्राहकांवर त्याचा भार पडेल.
माओ यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “परदेशी देश टॅरिफ भरतात का? नाही अमेरिकन व्यवसायिक हे पैसे भरतात आणि नंतर तो खर्च तुमच्यावर ढकलतात. टॅरिफमुळे उत्पादकता परत येत नाही. ते फक्त अमेरिकनांवर लादलेला एक कर आहे.”
दरम्यान, ही पोस्ट अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा ट्रम्प यांनी चीनवर लावलेल्या आयात करामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. ट्रम्प यांनी “प्रतिपूर्ती टॅरिफ” असे संबोधून चीनच्या वस्तूंवर 145 टक्के आयात कर लावला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन वस्तूंवर 125 टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवले आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनच्या या परस्पर टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील सुमारे 650 अब्ज डॉलर्सच्या व्यापार धोक्यात येण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमधून बोलताना सांगितले, “आम्ही आमचं म्हणणं लादू शकतो, पण आम्ही न्याय्य वागण्याचा प्रयत्न करतो. आम्ही टॅरिफ लावू शकतो आणि ते आमच्यासोबत व्यापार न करण्याचा किंवा कर भरून व्यापार करण्याचा निर्णय घेऊ शकतात.”
शुक्रवारी ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, त्यांना चीनवर लावलेल्या टॅरिफबाबत कोणतीही अडचण नाही. त्यांनी सूचित केले की, बीजिंगसोबत करार करण्याची शक्यता देखील आहे, आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे त्यांनी कौतुकही केले. मात्र सध्या तरी दोन्ही देशांनी माघार घेण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “जेव्हा अमेरिका मार खाते, तेव्हा ती त्याहून जोरात प्रत्युत्तर देते, असे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.”
ट्रम्प प्रशासनाने स्मार्टफोन्स, संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना टॅरिफमधून सवलती दिल्या आहेत. यामुळे Apple सारख्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, ॲपल चीनमधून मोठ्या प्रमाणावर उत्पादने आयात करते.
अमेरिकेच्या सीमाशुल्क संरक्षण विभागाने एका अधिसूचनेत 4 एप्रिल रोजी सकाळी 4:01 (GMT) पासून लागू होणाऱ्या सूट दिलेल्या टॅरिफ कोड्सची यादी जाहीर केली.
या यादीत 20 उत्पादन विभाग आहेत – ज्यात संगणक, लॅपटॉप्स, डेटा प्रोसेसिंग उपकरणे, चिप्स, आणि फ्लॅट पॅनल डिस्प्ले यांचा समावेश आहे. या निर्णयामागे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही, मात्र ही अचानक दिलेली सवलत Apple, Dell Technologies यांसारख्या कंपन्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे.
आयात कर (टॅरिफ) एखाद्या देशातील निर्यातदाराच्या वस्तूंना महाग करून स्पर्धा कमी करण्यासाठी वापरले जातात. मात्र, प्रत्यक्षात हे कर आयात करणाऱ्या कंपन्या भरतात, आणि त्याचा खर्च ग्राहकांवर टाकला जातो.
चीनकडून अमेरिकन जनतेला उद्देशून थेट संदेश दिला जात असून, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका अमेरिकन ग्राहकांना बसत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक व्यापारसाखळीवर या युद्धाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.