Donald Trump Iran attack |
वॉशिंग्टन: आम्हाला पेट्रोल-डिझेलची गरज नाही. आमच्याकडे स्वतःसाठी पुरेसे तेल उपलब्ध आहे. ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तेल उत्पादनाच्या बाबतीत आम्ही इतर कोणत्याही देशापेक्षा दुप्पट प्रगती केली आहे, अशी शेखी मिरवत अमेरिकेने इराणवर तेलासाठी हल्ला केलेला नाही. इतर देशांच्या हितासाठी 'होर्मुझ सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) सुरक्षित ठेवण्यासाठी हल्ला केला असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ट्रम्प म्हणाले, “आम्हाला तेलाची गरज नाही. आमच्याकडे स्वतःसाठी पुरेसे तेल उपलब्ध आहे. ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तेल उत्पादनाच्या बाबतीत आम्ही इतर कोणत्याही देशापेक्षा दुप्पट प्रगती केली आहे. त्यामुळे आम्हाला त्याची गरज नाही. पण, तिथे आमचे काही चांगले मित्र देश आहेत, म्हणून आम्ही हे केले. आम्ही तिथल्या मध्य-पूर्वेतील देशांसाठी आणि इस्रायलसाठी हे केले आहे. आम्ही यासाठी कधीही मोबदला मागितला नाही. आम्ही तिथे स्वतःसाठी नाही तर इतर देशांना वाचवण्यासाठी आहोत.”
होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या या कारवाईचा फायदा अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांना होत आहे, कारण त्यांचे ऊर्जा मार्ग याच भागातून जातात. चीनने आमचे आभार मानले पाहिजेत. जपान आणि दक्षिण कोरियानेही आभार मानले पाहिजेत. या सर्व देशांना त्यांच्या गरजेची ९० टक्के ऊर्जा याच सामुद्रधुनीतून मिळते."
यावेळी त्यांनी नाटो (NATO) सदस्य आणि इतर मित्रराष्ट्रांकडून मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “नाटोची समस्या ही आहे की, आम्ही नेहमी त्यांच्यासाठी उभे असतो, पण ते कधीच आमच्यासाठी उभे राहत नाहीत. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिकेला कोणाच्याही मदतीची गरज नाही"
ट्रम्प यांनी चीन, जपान आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, अद्याप कोणत्याही देशाने सार्वजनिकरित्या युद्धनौका पाठवण्याचे मान्य केलेले नाही. पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी संसदेत सांगितले की, "युद्धनौका पाठवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कायदेशीर चौकटीत राहून काय करता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत." तर ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नौदलाचे जहाज पाठवणार नाहीत. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांनी या प्रकरणात नाटोची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले. तर युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्री काजा कॅलास यांनी सध्यातरी ऑपरेशनच्या धोरणात बदल करण्याची शक्यता नाकारली. तसेच ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्पष्ट केले की, त्यांचा देश कोणत्याही "मोठ्या युद्धात" ओढला जाऊ इच्छित नाही. दरम्यान, रविवारी 'द फायनान्शिअल टाइम्स'शी बोलताना ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, जर मित्रराष्ट्रांनी मदत करण्यास नकार दिला, तर ते "नाटोच्या भविष्यासाठी अत्यंत वाईट" असेल.