पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी अधिकृतपणे सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवरील शुल्क २५ टक्क्यांपर्यंत वाढवले. या निर्णयामुळे अमेरिकेतील कारखान्यांत रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला. ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्यांमुळे शेअर बाजाराला हादरे बसत आहेत. तसेच आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती असतानाही ट्रम्प यांनी ट्रम्प आयात शुल्क वाढवले आहे. त्यांनी २०१८ च्या धातूंवरील सर्व शुल्क सवलती काढून टाकल्या आहेत. तसेच ॲल्युमिनियमवरील शुल्क १० टक्क्यांनी वाढवले आहे.
ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर वेगवेगळे शुल्क लादले आहेत. तसेच त्यांनी २ एप्रिलपासून परस्पर (रेसिप्रोकल) शुल्क आकारण्याची घोषणा केली. युरोपियन युनियन, ब्राझील आणि दक्षिण कोरिया येथून होणाऱ्या आयातीवरही शुल्क लागू करण्याची त्यांनी योजना आखली आहे, असे वृत्त एपी न्यूजने दिले आहे.
मंगळवारी बिझनेस राउंडटेबलमध्ये ट्रम्प यांनी सीईओंना संबोधित करताना सांगितले की, आयात शुल्क लागू केल्याने कंपन्यांना अमेरिकेतील कारखान्यांत गुंतवणूक करणे भाग पडेल. कारखाने परत आणण्यासाठी उच्च शुल्क लागू करण्याची योजना अधिक प्रभावी ठरेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
मंगळवारी, ट्रम्प यांचा कॅनडाच्या स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांनर ५० टक्के शुल्क लागू करण्याचा विचार होता. पण मिशिगन, मिनेसोटा आणि न्यूयॉर्कसाठी वीज अधिभार लागू करण्याची योजना कॅनडाने रद्द केल्यानंतर २५ टक्के शुल्क कायम ठेवले.
"स्टीलवरील अमेरिकेच्या शुल्कामुळे स्पर्धा वाढेल आणि इतर स्टील उत्पादक बाजारपेठांत अतिरिक्त पुरवठा वाढू शकतो. भारतीय स्टील उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी वाढत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल," असे मूडीज रेटिंग्जचे सहाय्यक उपाध्यक्ष हुई टिंग सिम यांनी म्हटले आहे.
स्टील आणि ॲल्युमिनियमवरील २५ टक्के कर लागू करण्याची नुकतीच केलेली घोषणा जागतिक पातळीवर चिंतेची बाब मानली जात आहे. तरीही भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर त्याचा कमी परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.