नवी दिल्ली : नेपाळमधील महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर, तिबेटमधील आणखी आठ हिमतलाव फुटण्याचा धोका निर्माण झाल्याचा इशारा केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिल्यामुळे भारत आणि नेपाळची धाकधूक वाढली आहे.
नेपाळमध्ये हिमनदी वितळल्याने आणि हिमकडा कोसळल्याने आलेल्या भीषण महापुरात प्रचंड नुकसान झाले आहे. उपग्रह छायाचित्रांनुसार, सुमारे ५,२०० मीटर उंचीवरून हिमनदीचा मोठा भाग तुटून १,२०० मीटर खाली दरीत कोसळला आणि त्यातून नेपाळच्या रसुवा भागात विनाशकारी पूर आला. या घटनेमुळे संपूर्ण तिबेटमधील हिमतलावर फुटण्याच्या धोक्यांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने पोईकू नदी खोऱ्याबद्दल इशारा दिला आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, १९६४ ते २०१७ दरम्यान या खोऱ्यातील हिमनदीच्या सरोवरांचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ११० टक्क्यांनी वाढले आहे. त्याच अभ्यासात वेगाने विस्तारणाऱ्या सात सरोवरांना संभाव्य धोकादायक म्हणून अधोरेखित केले आहे.
पोईकु नदी खोरे हे चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातील उंच पर्वतीय नदी खोरे आहे. नेपाळमध्ये खालच्या बाजूला ते भोटे कोशी आणि सुन कोशी म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ असा आहे की, नेपाळ आणि भारतासारखे देश या संभाव्य घटनांच्या शक्यतेमुळे असुरक्षितेच्या छायेत आहेत.
जेव्हा एखादी हिमनदी मागे सरकते, तेव्हा तिच्या समोर किंवा तिच्या काठावर एक जागा तयार होऊन तिथे वितळलेले पाणी जमा होऊ लागते. हे सरोवर हळूहळू मोठे होत जाते. जेव्हा सरोवरातील पाण्याचा दाब वाढतो, तेव्हा समस्या सुरू होतात.
हिमनदीचा मोठा भाग सरोवरात कोसळणे, हिमस्खलन, भूस्खलन, भूकंप किंवा पाण्याची पातळी वेगाने वाढणे यांसारख्या घटनांमुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. सामान्य पुरापेक्षा या घटना महाभयंकर असू शकतात. कारण, त्या बर्फ, खडक, चिखल आणि ढिगारेदेखील वाहून नेतात. हे विनाशकारी ठरू शकते. २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, हिमालय आणि तिबेटच्या पठारावरील अनेक भागांमध्ये हिमनदी सरोवरे विस्तारत आहेत. त्यांची नैसर्गिक धरणे हळूहळू कमकुवत होत आहेत.