अमेरिकेच्या टेक्सास राज्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर महापुरातील बळींची संख्या ८२ झाली आहे. मृतांमध्ये २८ मुलांचा समावेशआहे. मुसळधार पाऊस आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे या भागात माेठी वित्तहानी झाली आहे.
टेक्सासमधील केर काउंटीमध्येच ६८ मृतदेह सापडले आहेत. ट्रॅव्हिस, बर्नेट, केंडल, टॉम ग्रीन आणि विल्यमसन या काउंट्यांमध्ये पुरबळींची संख्या दहा झाली आहे. केर काउंटीमध्ये 'कॅम्प मिस्टिक'सह अनेक युवा शिबिरे आहेत. बेपत्ता व्यक्ती सापडत नाहीत तोपर्यंत आमचा शोध सुरूच राहील," असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. , ४० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापैकी बरेच जण 'कॅम्प मिस्टिक' या मुलींच्या समर कॅम्पमधील विद्यार्थिनी आणि कर्मचारी आहेत. बचावकार्याला गती देण्यासाठी अतिरिक्त हवाई दलाची मदत तैनात केली आहे.
महापुराची विनाशकारी सुरुवात शुक्रवारी पहाटे झाली. मध्य टेक्सासमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. ग्वाडालुपे नदीची पातळी पहाटेच्या सुमारास अवघ्या ४५ मिनिटांत तब्बल २६ फूट (सुमारे ८ मीटर) इतकी वाढली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने घरे आणि कॅम्पसाईट उद्ध्वस्त केली, तसेच वाहने आणि इमारतीही वाहून गेल्या.राष्ट्रीय हवामान सेवेने एक दिवस आधीच धोक्याचा इशारा दिला होता, ज्यात शुक्रवारी पहाटे 'अचानक येणाऱ्या पुराचा गंभीर धोका' (flash flood emergencies) असल्याचा इशार्याचा समावेश होता.
शुक्रवारपासून बचाव पथके हेलिकॉप्टर, बोटी, ड्रोन आणि अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पूरग्रस्त भागात अहोरात्र शोधकार्य करत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८५० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (दि. ७ )सांगितले की, एक भयंकर घटना. केर काउंटीसाठी 'मोठी आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. टेक्सासमध्ये आता बचावकार्य सुरु आहे. मी आजच गेलो असतो, पण त्यामुळे त्यांच्या कामात अडथळा आला असता. त्यामुळे आता शुक्रवारी मी टेक्सासला भेट देणार आहे. यामुळे आता फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीला (FEMA) आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात करता येणार आहे.टेक्सासच्या सॅन अँटोनियो परिसरात १,००० हून अधिक बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांच्या शोधात गुंतले आहेत.