Thailand One-day PM Suriya Jungrungreangkit Thai political crisis Shinawatra family bollywood movie Nayak
बँकॉक : भारतात 2001 सालात शंकर दिग्दर्शित नायक या चित्रपटात अनिल कपूर यांनी एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाल्याची आणि त्या एक दिवसात संपूर्ण व्यवस्था बदलून टाकल्याची कथा होती. या चित्रपटाची आठवण होण्याचे कारण म्हणजे असाच प्रसंग आता वास्तवात घडला आहे.
थायलंडमध्ये सध्या राजकारणाच्या रणधुमाळीत चांगलाच ट्विस्ट आला असून त्या देशातही चक्क एक दिवसाचा पंतप्रधान बनला आहे. थायलंडचे उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते सुरिया जुनग्रुंगेअरंगकिट यांनी एका दिवसासाठीच थायलंडचे कार्यवाह पंतप्रधान पद स्वीकारले. या घटनेनंतर अनेक नेटीझन्सना नायक चित्रपट आठवला.
थायलंडच्या विद्यमान पंतप्रधान पायथॉन्गटार्न शिनावात्रा यांना मंगळवारी (1 जुलै) थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने निलंबित केलं. एका गोपनीय ऑडिओ क्लिपमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर नैतिक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
त्या क्लिपमध्ये पायथॉन्गटार्न यांनी कंबोडियाच्या माजी पंतप्रधान हुन सेन यांना ‘काका’ म्हणत संबोधलं, आणि थायलंडच्या लष्करी अधिकाऱ्याला 'शत्रू' म्हणून उल्लेख केला होता. हे वक्तव्य मे महिन्यातील सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होतं.
त्यामुळेच 70 वर्षीय सुरिया जुनग्रुंगेअरंगकिट यांची तात्पुरत्या स्वरूपात कार्यवाह पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. तो दिवस 2 जुलैचा होता, जेव्हा पंतप्रधान कार्यालयाच्या स्थापनेला 93 वर्षे पूर्ण होत होती – आणि सुरिया यांचा कार्यकाळ अवघ्या 24 तासांचा. हा योगायोग फारच लक्षवेधी होता.
पुढे काय?
उद्या म्हणजेच गुरुवारी (3 जुलै) अपेक्षित कॅबिनेट फेरबदलात फुमथाम वेचयाचाय यांची नवीन उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यामुळे सुरिया यांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपणार आहे.
सुरिया जुनग्रुंगेअरंगकिट हे एक अनुभवी, अनेक सरकारांमध्ये मंत्री राहिलेले नेते आहेत. त्यांना ‘राजकीय वारं कशाकडे वाहतंय, हे ओळखणारा नेता’ म्हणून ओळखलं जातं. सध्या ते परिवहन मंत्री आणि उपपंतप्रधान होते.
त्यांच्या नेतृत्वात फार काही घडण्याची अपेक्षा नसली, तरी या एकदिवसीय पंतप्रधानपदामुळे त्यांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं.
थायलंडच्या राजकारणावर दीर्घकाळ दबदबा गाजवलेलं शिनावात्रा कुटुंब आता अडचणीत सापडलं आहे. पायथॉन्गटार्न यांचे वडील, माजी पंतप्रधान थॅक्सिन शिनावात्रा यांच्यावरही सध्या राजद्रोहाचे आरोप आहेत.
पायथॉन्गटार्न यांचा पंतप्रधानपदावरून निलंबन आणि त्यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याने ‘प्यू थाय’ पक्षाचं भवितव्यही अनिश्चिततेत सापडलं आहे.