पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत- कॅनडा वादादरम्यान टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याबाबत मोठे भाकित केले आहे. मस्क यांनी गुरुवारी म्हटले आहे की, पुढील निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांना जनता नाकारेल आणि परिणामी ते कॅनडाचे पंतप्रधानपद गमावतील. "आगामी निवडणुकीत त्यांचे पद जाईल," अशी पोस्ट एलन मस्क यांनी X वर केली आहे. ट्रूडो यांना पदावरून हटविण्याच्या यूजर्संच्या विनंतीला प्रतिसाद देत मस्क यांनी ही पोस्ट केली.
ट्रुडो पियरे पॉइलीव्हरे यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टी आणि जगमीत सिंग यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टी यांना निवडणुकीत आव्हान देण्याची तयारी करत असताना हे भाकित करण्यात आले आहे. यापूर्वीही मस्क यांनी कॅनडा सरकारच्या भूमिकेवर टीका केली होती.
अमेरिकेतील सत्तेत डोनाल्ड ट्रम्प यांनी वापसी केल्याने ट्रुडो यांच्या प्रशासनासमोर आव्हाने वाढली आहेत. कॅनडाची अर्थव्यवस्था ही अमेरिकेतून होणाऱ्या ७५ टक्के निर्यातीवर अवलंबून आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावित धोरणांमुळे कॅनडावर परिणाम होऊ शकतो.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Canada PM Justin Trudeau) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण जस्टिन ट्रुडो यांना आता त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान, त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांनी (Liberal lawmakers) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना चौथ्यांदा निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला आहे. ट्रूडो यांनी याआधी, पुन्हा निवडणूक रिंगणात उतारण्याची इच्छा बोलून दाखवली होती. दरम्यान, गेल्या सुमारे १०० वर्षांत एकाही कॅनडाच्या पंतप्रधानाला सलग चार वेळा विजय मिळवता आलेला नाही.