पुढारी ऑनलाईन डेस्क : "मॉस्को आणि नवी दिल्ली सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत आहे. आम्ही भारतासोबतची मैत्री अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारत हा एक महान देश आहे. जगातील सर्वात मोठ्या वाढत्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असे गौरवोद्गार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काढले. ते सोची येथील वाल्डाई डिस्कशन क्लबला संबोधित करताना बोलत होते. (India–Russia relations)
या वेळी व्लादिमीर पुतिन म्हणाले की, "भारत हा रशियाचा एक नैसर्गिक मित्र आहे. आमची मैत्री वास्तवावर आधारित आहे. आमच्यातील सहकार्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. दोन राष्ट्रांमधील गुणवत्तेच्या आणि विश्वासाच्या जोरावर अद्वितीय संबंध निर्माण झाले आहेत. द्विपक्षीय संबंध विकसित करण्यावर आमचा भर आहे."
भारत जागतिक महासत्तांच्या यादीत समाविष्ट होण्यास पात्र आहे. भारत हा जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान वाढ होणारी अर्थव्यवस्था आहेच त्याबरोबर प्राचीन संस्कृतीच्या पाया हे पुढील वाढीसाठी खूपचा आश्वासक आहे. भारत आणि रशिया यांच्यात सुरक्षा क्षेत्रात आणि संरक्षण क्षेत्रात संपर्क विकसित होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय संरक्षण दलात मोठ्या प्रमाणावर रशियन लष्करी उपकरणे वापरली जातात. दोन्ही देशांच्या नात्यात मोठा विश्वास आहे. आम्ही केवळ आमची शस्त्रे भारताला विकत नाही; आम्ही त्यांची संयुक्तपणे रचना करण्यासाठी संयुक्त संशोधनही करत असल्याचे सांगत त्यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीकडे लक्ष वेधले. हे आमच्या भागीदारीच्या उच्च पातळीची साक्ष देते, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले. ब्रह्मोसचे नाव भारत आणि रशियाच्या ब्रह्मपुत्रा आणि मॉस्क्वा नद्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाचे NPO माशिनोस्ट्रोयेनिया यांच्या संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन केले गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात रशियाने आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणि दोन्ही देशांमधील लोकांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान "ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल" प्रदान केला होता.