इराण आणि इस्रायल संघर्ष आता धोकादायक वळणावर पोहचला आहे. शनिवारी रात्री व आज पहाटे दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र डागली. इस्रायलने तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. तसेच तेहरान आणि बुशहरमधील तेल डेपो आणि गॅस रिफायनरीसह १५० हून अधिक लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे आता पश्चिम आशियातील रक्तरंजित संघर्ष आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील ४८ तासांपासून इराण आणि इस्त्रायल संघर्षात आतापर्यंत १३८ इराणी नागरिक मारले गेले आहेत. यामध्ये ९ अणुशास्त्रज्ञ आणि २० हून अधिक इराणी कमांडरांचा समावेश आहे. ३५० हून अधिक जखमी झाले आहेत. इराणची राजधानी तेहरानसह ७ राज्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. इराणनेही इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले आहे. हल्ल्यात ७ इस्रायली नागरिक ठार झाले आहेत तर २१५ हून अधिक जखमी झाले आहेत. इराणने ३ इस्रायली एफ-३५ विमाने पाडल्याचा दावाही केला आहे.
शनिवारी रात्री उशिरा इस्रायलमध्ये इराणने ४ ठिकाणी हल्ला केला. टाईम्स ऑफ इस्रायलनुसार, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात वृद्ध महिलेसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२५ जण जखमी झाले आहेत.तेल अवीव व्यतिरिक्त इराणने बट याम, रेहोवोट आणि रमत गान येथे क्षेपणास्त्रे डागली. आतापर्यंत इस्रायलमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने म्हटले आहे की, आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा केंद्राला (आयएईए) सहकार्य करणार नाही. तसच इस्रायली हल्ल्यांबद्दल 'आयएईए'च्या मौनावर इराणने नाराजी व्यक्त केली आहे.इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम घारीबादी यांनी सांगितले की, आमच्या केंद्रावर हल्ला झाल्यानंतरही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा केंद्राने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आता यापुढे आम्ही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा केंद्राला कोणतेही सहकार्य करणार नाही.
इराणच्या अण्विक कार्यक्रमालाविरोध करत इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले. २०० लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला.
इस्त्रायलच्या हल्ल्यात ९ इराणी शास्त्रज्ञ आणि २० हून अधिक लष्करी कमांडर मारले गेले.
इराणने प्रत्युत्तर 'ट्रू प्रॉमिस थ्री' मोहिम राबवत १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली.
इराणने इस्रायली संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला.
इराणने अणु करारावर स्वाक्षरी करावी अन्यथा मोठा हल्ला होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला.
इस्रायली राष्ट्राध्यक्षांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
इराणने तीन इस्रायली एफ-३५ विमाने पाडल्याचा दावा केला.
इस्रायलमध्ये ७ जणांचा मृत्यू. ७ सैनिकांसह १३० हून अधिक लोक जखमी झाले.
इराण आणि अमेरिकेतील अणु चर्चा रद्द .