Pakistani Tik Tok Star | पाकिस्तानमधील टिक टॉक स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सना युसूफ ( Sana Yousaf) हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना राजधानी इस्लामाबादमध्ये घडली. सनला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकाने तिच्या गोळीबार केला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून, ऑनर किलिंगसह या घटनेमागील सर्व संभाव्य कारणांचा तपास सुरू आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर हा सनाचा नातेवाईक आहे. तो घरी आला. सनावर अंदाधूंद गोळीबार केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. दोन गोळ्या लागल्याने सनाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे, परंतु अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही.
या घटनेमागील अनेक कारणांचा पोलिस तपास करत आहेत. संशयिताची ओळख पटविण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. ऑनर किलिंगच्या शक्यतेसह सर्व संभाव्य कारणे ते लक्षात घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या तपासात सनाच्या हत्येमागील कारण काय आहे हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या मते, परस्पर वैमनस्य, वैयक्तिक वाद किंवा अन्य कोणतेही कारण असू शकते, अशी शक्यता स्थानिक पाोलिसांनी व्यक्त केली आहे.
सना युसूफ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होती. तिचे इंस्टाग्रामवर सुमारे ४.९२ लाख फॉलोअर्स होते. ती अनेकदा महिला हक्क, सांस्कृतिक ओळख आणि सकारात्मक सामाजिक संदेशांवर व्हिडिओ बनवत असे. सनाच्या हत्येवर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला न्याय देण्याची मागणी केली आहे. #JusticeForSanaYousuf सारखे हॅशटॅग द वर ट्रेंड करू लागले आहेत.