Microsoft Layoffs
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरुच आहे. मायक्रोसॉफ्टने बुधवारी सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. ही यावर्षीतील कंपनीची दुसरी मोठी नोकरकपात आहे. या नोकरकपातीचा मायक्रोसॉफ्टमधील जागतिक स्तरावरील एकूण मनुष्यबळाच्या जवळपास ४ टक्के कर्मचाऱ्यांना फटका बसला. यात Xbox गेमिंग विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या नोकरकपातीसह अनेक हाय-प्रोफाइल गेम रद्द करणे आणि स्टुडिओ बंद करण्याची घोषणा करण्यात आली. याबाबतचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.
कंपनीच्या कामकाजात सुधारणा आणि व्यवस्थापन स्तर कमी करण्याच्या उद्देशाने ही नोकरकपात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. गतिशील बाजारपेठेत कंपनीचे स्थान मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बदल आवश्यक आहे. हे नोकरकपातीचे प्राथमिक कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या नोकरकपातीमुळे मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागातील शेकडो पदे कमी करण्यात आली आहे. यात किंग (कँडी क्रश मेकर्स), झेनीमॅक्स, रेवेन सॉफ्टवेअर, स्लेजहॅमर गेम्स, हॅलो स्टुडिओ आणि टर्न १० स्टुडिओ यांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टकडून द इनिशिएटिव्ह स्टुडिओदेखील बंद करण्यात आला आहे. तसेच परफेक्ट डार्क रिबूट आणि फॅन्टसी गेम एव्हरवाइल्डवरील कामही थांबवले आहे.
मायक्रोसॉफ्टकडून स्टॉकहोम येथील किंग विभागातील त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के (सुमारे २०० पदे) नोकरकपात केली जात आहे. AAAएक्सक्लुझिव्ह विकसित करण्यासाठी उभारलेला प्रीमियम Xbox स्टुडिओ पूर्णपणे बंद केला जाणार आहे. जानेवारी २०२४ पर्यंत गेमिंग विभागात सुमारे २० हजार कर्मचारी काम करत होते.
टेक क्षेत्रात २०२५ मध्ये जागतिक स्तरावर १ लाखाहून अधिक नोकरकपात करण्यात आली आहे. इंटेल, मेटा आणि गुगल सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आर्थिक दबाव, पुनर्रचना आणि AI मुळे होत असलेल्या बदलांमुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत असल्याचे दिसून आले आहे.