Taliban peace deal withdrawal:
अफगाणिस्ताननं पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या शांती करारातून माघार घेत मोठा झटका दिला आहे. त्यानंतर वैतागलेल्या पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी पुन्हा एकदा भारताकडं बोट दाखवलं आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तान हे भारताचा हस्तक असल्यासारखं वागतोय. तो आमच्या देशात दहशतवाद परसवतोय अशी टीका केली. याचबरोबर जर अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पन्नास पटीनं अधिक तीव्र प्रत्युत्तर मिळेल असं देखील आसिफ म्हणाले.
एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'ज्या ज्यावेळी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील शांती कराराची बोलणी शेवटच्या टप्प्यात येते. चर्चा करणारा व्यक्ती काबूलमध्ये रिपोर्ट करतो. तिथं हस्तक्षेप होतो अन् करार रद्द केला जातो. मला वाटतं की ही शांती कराराची बोलणी उधळवून लावली जात आहे. आम्ही करार केला होता. मात्र चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काबूलला कॉल केला अन् त्यांनी करारातून माघार घेतली.'
दरम्यान, पाकिस्तानच्या या दाव्यावर अफगाणिस्ताननं यापूर्वीच प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी पाकिस्तान पुराव्याशिवाय आरोप करत आहे सांगितलं होतं.
अफगाणिस्तान सोबतच्या शांती करार फिसकटल्यानंतर ख्वाजा म्हणाले की, 'मी त्यांच्या शिष्टमंडळाकडे तक्रार करणार आहे. मात्र सगळी सूत्र काबूलमधील माणसं हलवत आहेत. ते भारताच्या बाहुल्या असल्यासारखं वागत आहेत. त्यांचा सर्वांचा कंट्रोल हा दिल्लीत आहे.'
ख्वाजा इथंच गप्प बसले नाहीत तर त्यांनी भारत हा पश्चिम सीमेवर त्यांचा झालेला पराभवाचा बदला घेत असल्याचा जावई शोध लावला. ते म्हणाले, 'काबूलच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारत त्यांचा पश्चिम सीमेवर झालेल्या पराभवाचा बदला घेत आहेत. भारत हा पाकिस्तान सोबत सौम्य स्वरूपाचं युद्ध करू इच्छितो. त्यासाठी ते काबूलचा वापर करत आहेत.'
अफगाणिस्तान हे इस्लामाबादवर हल्ला करू शकते याबाबत बोलताना आसिफ म्हणाले, 'जर अफगाणिस्ताननं इस्लामाबादकडं नुसतं पाहिलं जरी आम्ही त्यांचे डोळे काढून टाकू. ते दहशतवाद्यांचा वापर करू शकतात. ते आताही तेच करत आहेत. ते गेल्या चार वर्षापासून दहशतवादाचाच वापर करत आहेत. तेच पाकिस्तानातील दहशतवादासाठी कारणीभूत आहेत. काबूल हे दिल्लीचे हस्तक आहेत. जर त्यांना इस्लामाबादवर हल्ला करायचा आहे तर करू देत आम्ही त्यांना त्याच्यापेक्षा ५० पटीनं जास्त तीव्रतेचं उत्तर देऊ.'
दरम्यान, अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब यांनी यापूर्वीच पाकिस्तानचे हे आरोप तर्कहीन असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी आम्ही स्वतंत्र देश असून आम्ही भारतासोबतचे आमचे नाते टिकवून ठेवू याच्यावर देखील भर दिला.