अमेरिकेने तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली यांच्यात असलेल्या जवळच्या संबंधांबद्दलची माहिती उघड केली आहे.  (file photo)
आंतरराष्ट्रीय

Tahawwur Rana | 26/11 हल्ल्यानंतर तहव्वूर राणाचे हेडलीशी संभाषण, 'निशान-ए-हैदर'चा उल्लेख

तहव्वूर राणाला दहशतवाद्यांना द्यायचा होता पाकचा सर्वोच्च सन्मान! US रिपोर्टमधून मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी ताब्यात घेतले. राणाचे प्रत्यार्पण करुन भारतात आणल्यानंतर लगेच त्याला एनआयएने दिल्लीच्या पालम विमानतळावरूनच ताब्यात घेतले. तो १८ दिवसांसाठी एनआयच्या कोठडीत राहील. यादरम्यान त्याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबतच्या अधिकृत निवेदनात, अमेरिकेच्या न्याय विभागाने तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली यांच्यात असलेल्या जवळच्या संबंधांबद्दलची नवीन माहिती उघड केली आहे.

मुंबईतील 26/11 (26/11 attacks) हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याने सहसूत्रधार डेव्हिड हेडली याच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान 26/11 च्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च वीरता पुरस्कार देण्याची मागणी केली होती, अशी माहिती अमेरिकेने इंटरसेप्टेड केलेल्या कॉल्समधून पुढे आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुंबईतील १२ ठिकाणी हल्ले हे लष्कर-ए-तैयबाच्या १० दहशतवाद्यांनी घडवून आणले होते. या हल्ल्यात सुमारे १६६ लोकांचा मृत्यू झाला. तहव्वूर राणा याने हेडलीला मुंबई हल्ल्यांबाबत असेही सांगितले होते की "भारतीय लोकांच्याबाबतीत असे करणे योग्य होते". डेव्हिड हेडली हा तोच व्यक्ती आहे ज्याने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या आदेशावरून मुंबईतील हल्ल्यांच्या ठिकाणांची रेकी केली होती.

हेडलीशी झालेल्या संभाषणात राणा काय म्हणाला होता?

"हेडलीशी झालेल्या संभाषणात, राणाने लष्कर-ए-तैयबा नऊ दहशतवाद्यांचे कौतुक केले, जे या हल्ल्यात मारले गेले. त्याने म्हटले की 'त्यांना निशाण-ए-हैदर देण्यात यावा'.'निशान-ए-हैदर' हा पाकिस्तानचा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे.

१० दहशतवाद्यांपैकी केवळ एक दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

मूळचा पाकिस्तानचा असलेला कॅनडाचा नागरिक राणा सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. १९९० च्या दशकात पाकिस्तान सोडून कॅनडाला गेलेल्या ६४ वर्षीय राणाने हेडलीला त्याच्या इमिग्रेशन कन्सल्टन्सी व्यवसायातून लॉजिस्टिक मदत पुरवली होता.

"इतर गोष्टींसोबतच राणाने त्याच्या इमिग्रेशन व्यवसायाची मुंबईत शाखा सुरु करण्यास तसेच हेडलीला इमिग्रेशन व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना त्याला कार्यालयाचा व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते," असे अमेरिकेने निवेदनात म्हटले आहे.

राणा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेच्या थेट संपर्कात होता

एनआयएने राणावर गुन्हेगारी कट रचणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, खून आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हे नोंद केले आहेत. हेडलीने पाकिस्तानमधील लष्करकडून प्रशिक्षण घेतले होते. मुंबईवरील हल्ल्याची योजना आखण्यासाठी तो दहशतवादी संघटनेच्या थेट संपर्कात होता, असे न्याय विभागाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT