पुढारी ऑनलाईन डेस्क : सीरीयातील बंडखोरांनी (Syria Civil War) राजधानीचे शहर दमास्कसवर ताबा मिळवला. त्यांनी एक एक करत सीरीयातील सर्व शहरांवर कब्जा केला. यामुळे सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी देशातून पलायन केले. त्यांनी रशियामध्ये आश्रय घेतला असल्याचे वृत्त रशियाच्या सरकारी मीडियाने दिले आहे. रशिया हा असाद यांच्या राजवटीत त्यांचा प्रमुख मित्र देश होता. यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला तेथे आश्रय मिळाला असल्याचे वृत्त आहे.
सीरियातील बशर-अल-असाद सरकारला देशातील बंडखोर गटांनी आव्हान देत जवळपास सर्व सीरियावर ताबा मिळवला. यामुळे ५० वर्षांहून अधिक काळाच्या हुकूमशाहीनंतर असद कुटुंबाने सीरियावरील नियंत्रण गमावले. सीएनएनने रशियातील एका अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, बंडखोरांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या कुटुंबाने मॉस्कोला पलायन केले आहे आणि तिथे त्यांना राजकीय आश्रय देण्यात आला आहे.
बशर अल-असाद रशियाला पळून गेल्यानंतर सीरियन लोकांनी दमास्कसमधील (Damascus) त्यांच्या निवासस्थानांची तोडफोड केली. काही व्हिडिओंमध्ये बंडखोर आणि नागरिक त्याच्या पूर्वीच्या घरांच्या आवारात घुसल्याचे दिसून आले आहे.
मुख्य बंडखोर गटाचा नेते अबू मोहम्मद अल-जोलानी यांनी दमास्कसमधील त्यांच्या पहिल्या सार्वजनिक भाषणात, असद यांचे सरकार पाडणे हा संपूर्ण इस्लामिक राष्ट्राचा विजय असल्याचे म्हटले आहे. जोलानीच्या एचटीएस गटाच्या नेतृत्वाखालील बंडखोर हे अल कायदाशी संलग्न आहेत. अल्पसंख्याकांची सुरक्षा केली जाईल, असे जोलानी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी असाद राजवट उलथवून टाकण्याच्या घटनेचे स्वागत केले आहे. त्यांनी या सत्तापालट घडामोडीचे सीरियातील सहनशील लोकांसाठी एक चांगले भविष्य घडवण्याची एक ऐतिहासिक संधी म्हणून वर्णन केले आहे. पण हादेखील या प्रदेशातील जोखीम आणि अनिश्चिततेचा क्षण असल्याचे सांगत त्यांनी सावध केले आहे.
रॉयटर्सने दोन प्रादेशिक सुरक्षा सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे की, रविवारी सीरियाच्या राजधानीत इस्रायलने तीन हवाई हल्ले केले होते. याबाबत इस्रायलच्या सैन्याने कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
काही दिवसांपूर्वी देशाच्या उत्तरेकडील शहर इदलिब येथील सशस्त्र विरोधी गटाने हयात तहरीर अल-शामच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध कारवाई सुरू केली होती. त्यानंतर या गटाने एकामागून एक असे करत अनेक मोठ्या शहरांवर कब्जा केला.